सेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:32 PM2019-08-20T16:32:50+5:302019-08-20T16:35:32+5:30
सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर आता एका व्यक्तीला या वेबसिरिजमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर आता एका व्यक्तीला या वेबसिरिजमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. खरे तर या व्यक्तीचा या वेबसिरिजशी काहीही संबंध नाहीये. पण तरीही या वेबसिरिजमुळे या व्यक्तीच्या डोक्याला ताप झाला आहे.
सेक्रेड गेम्स 2 मध्ये एका दृश्यात केनियात भारतीय एमबीसीत काम करणारी यादव ताई (अमृता सुभाष) गणेश गायतोंडेला (नवाझुद्दीन सिद्दीकी) ला एक चिठ्ठी देते असे दाखवण्यात आले आहे. या चिठ्ठीत इसाचा नंबर असल्याचे ती त्याला सांगते. खरं तर या चिठ्ठीत काय लिहिले आहे हे आपल्याला दाखवण्यात आलेले नाही. पण सबटायटलमध्ये हा नंबर लिहिण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा नंबर ज्या व्यक्तीचा आहे, त्याला प्रचंड त्रास होत आहे. हा नंबर संयुक्त अरब अमिरातीत राहाणाऱ्या कुन्हाब्दुल्ला या भारतीयाचा असून या नंबरवर त्याला जगभरातील लोक फोन करत आहेत. या सगळ्यामुळे हा व्यक्ती अक्षरशः कंटाळला आहे.
कुन्हाब्दुल्लाने मीडियाशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत मला भारत, पाकिस्तान, नेपाळ अशा विविध देशातून लोक फोन करत आहेत. सुरुवातीला तर लोक मला का फोन करत आहेत हेच मला कळत नव्हते. सेक्रेड गेम्स नावाची कोणती वेबसिरिज आहे का हेच मला माहीत नव्हते. मी एका तेल कंपनीत नोकरी करतो. तिथे मी सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो. त्यामुळे अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ देखील नाहीये. मला फोन करून लोक इसा अशी हाक मारतात. हा इसा कोण आहे? याचा माझ्याशी काय संबंध हेच मला कळत नाही. आता तर साधी फोनची रिंग जरी वाजली तरी मला राग येतो. मला आता माझा हा नंबर बदलायचा आहे.
नेटफ्लिक्सने आता कुन्हाब्दुल्लाची माफी मागितली असून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर या सबटायटलमधून हा नंबर काढून टाकण्यात आलेला असल्याची देखील माहिती नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.