‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचा पहिला सीजन तुफान गाजला. इतका की, पहिल्या सीझननंतर याचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर दुसरा सीझनही आला. अर्थात हा सीझन पहिल्या सीझन इतका गाजला नाही. पण तरिही या सीझनची चर्चा झाली होती. आता चाहत्यांना या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे.
होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन (Sacred Games 3 ) बनणार नाहीये. दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) तसा खुलासा केला आहे. यामागचं कारणही त्याने सांगितलं. होय, अनुराग कश्यपचं खरं मानाल तर, ‘तांडव’ या सैफ अली खानच्या वेबसीरिजमुळे ‘सेक्रेड गेम्स ३’चा बेत रद्द करण्यात आला आहे.
याविषयीच बोलताना अनुराग म्हणाला, “नेटफ्लिक्समध्ये आता सेक्रेड गेम्स ३ प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत राहिलेली नाही, कारण तांडवमुळे निर्माण झालेल्या वादामुळे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे घाबरले आहेत.” ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून दिग्दर्शित केली होती.
मध्यंतरी नवाजुद्दीन सिद्दीकी यानेही ‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नसल्याचं म्हटलं होतं. मूळ कादंबरीतील कथा सेक्रेड गेम्सच्या दोन्ही सीझनमध्ये दाखवण्यात आली आहे. विक्रम चंद्रांच्या कादंबरीत आता असेच काहीच उरलेलं नाही, जे आम्ही तिसऱ्या सीझनमध्ये दाखवू शकू,’ असं नवाज म्हणाला होता. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीनने गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती.