कलाकार : मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, सुमीत राघवन, सुहिता थत्तेलेखन-दिग्दर्शन : मृणाल कुलकर्णीनिर्माते : अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंगशैली : ड्रामा, रोमान्सकालावधी : एक तास ४७ मिनिटेदर्जा : तीन स्टार परीक्षण : संजय घावरे
आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर नाना तऱ्हेचे मित्र भेटतात. काहींसोबतची मैत्री मैत्रीच्या पलिकडे जाते, पण जीवनाच्या प्रवाहाशी एकरूप होताना त्यातील काही मित्र हरवून जातात. त्यातील एक जण अचानक दत्त म्हणून समोर येतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. या चित्रपटातही एका अशाच मित्राची गोष्ट आहे, जो खूप वर्षांनी आपल्या मैत्रीणीला भेटतो आणि तिला तिच्या स्वत्वाची जाणीव करून देतो. मुख्य भूमिकेतील मृणाल कुलकर्णीनी एका नितांत सुंदर नात्यावर सुरेख गोष्ट लिहिली असून, तितक्याच संयतपणे दिग्दर्शितही केली आहे.
कथानक : गोष्ट आहे क्षमा आणि विक्रम राजाध्यक्ष यांची. विक्रम मोठा व्यावसायिक असून, क्षमानं गोधड्या बनवणारा चौघडी हा ब्रँड लाँच केलेला आहे. ९०च्या दशकात कॅालेजमध्ये असणाऱ्या मित्र-मैत्रीणी रियुनियनचं आयोजन करतात. त्यात क्षमाला तिचे कॅालेजमधील सर्व मित्र-मैत्रीणी भेटतात. दुसऱ्या दिवशी निरंजन काणे नावाची एक व्यक्ती विक्रमचं फार्म पाहण्यासाठी येणार असते. विक्रमला अचानक बाहेर जावं लागतं त्यामुळे तो फार्म दाखवण्याची जबाबदारी क्षमावर सोपवतो. हा निरंजन दुसरा-तिसरा कोणीही नसतो तर क्षमाचा कॅालेजजीवनातील जुना मित्र असतो. मैत्रीच्या मर्यादांची सीमारेषा पार न करता दोघेही आपापल्या भावना एकमेकांशी शेअर करतात.
लेखन-दिग्दर्शन : मैत्रीच्या नात्याचे वेगळे पैलू सादर करणारी कथा मृणाल यांनी लिहिली असून, अतिरंजतपणाचा रंग चढू न देता अत्यंत साधेपणानं दिग्दर्शितही केली आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं सौंदर्यस्थळ आहे. आयुष्यात जे हवं ते सर्वांनाच मिळत नाही, पण कोणीही थांबत नाही. त्यामुळे बरेच जण या चित्रपटाशी स्वत:ला रिलेट करतील. क्षमाच्या आयुष्यात निरंजनची एन्ट्री झाल्यावर अतिशय विचारपूर्वक ती सर्व गोष्टींना सामोरी जाते. केवळ त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत न रमता पुन्हा नव्या जोमानं ट्रेकिंगलाही जाते. एकमेकांची सुख-दु:खं शेअर करताना संसारीक जबाबदाऱ्या आणि कुटुंबियांना खुश करण्याच्या कसरतीमध्ये जुनी क्षमा कुठेतरी हरवल्याची जाणीव निरंजनला होते. वर्तमानातील क्षमाची त्या जुन्या क्षमाशी भेट घालून देण्याचं काम निरंजन करतो. नयनरम्य लोकेशन्स खिळवून ठेवतील. सिनेमाचा शेवट खूप चांगला करण्यात आला असून, त्यातून प्रत्येकानं वेळीच सावध होण्याची गरज असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. कॅमेरावर्कही चांगलं आहे. 'सईबाई गं...' आणि 'मन कधी...' ही दोन्ही गाणी चांगली आहेत.
अभिनय : लेखन-दिग्दर्शनाइतकीच अभिनयाची बाजूही मृणाल यांनी लीलया पेलली आहे. क्षमा साकारताना तिच्या मर्यादांचं भान राखलं आहे. सुमीत राघवननं एक समजूतदार मित्राची व्यक्तिरेखाही तितक्याच सुरेख पद्धतीनं साकारली आहे. सुबोध भावेनं साकारलेला बिझनेसमनही लक्षात राहण्याजोगा आहे. पत्नीच्या मनातील भावना ओळखून त्यानं घडवलेला सकारात्मक बदल इतरांना प्रेरणादायी ठरावा असा आहे. सुहिता थत्तेंनी साकारलेली सासूही एका वेगळ्याच रंगात दिसली. इतर लहान-सहान भूमिकेतील कलाकारांनीही योग्य साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, लोकेशन्स.नकारात्मक बाजू : मसालेपटांच्या चाहत्यांसाठी या चित्रपटात फार काही नाही.थोडक्यात : स्त्री-पुरुषामधील मैत्रीच्या अनोख्या नात्यातील वेगळे पैलू अधोरेखित करणारा हा कौटुंबिक चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी एकदा तरी पहायला हवा.