साऊथची सुपरस्टार साई पल्लवी (Sai Pallavi ) तशी फार मोजकं बोलते. पण जे बोलते ते अगदी बिनधास्त. आपल्या अटींवर जगणारी अभिनेत्री म्हणून साई पल्लवी ओळखली जाते. सध्या ती तिच्या Virata Parvam या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई असं काही बोलली की सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. साईने ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्यांची तुलना मॉब लिचिंगशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावरचं वातावरण तापलं आहे. काही लोक तिचा सपोर्ट करत आहेत तर काही तिच्यावर भडकले आहेत.
नेमकं काय म्हणाली साई पल्लवीएका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत साई पल्लवीनं सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं. ती म्हणाली, ‘मी एका तटस्थ वातावरणात लहानाची मोठी झाली आहे. मी डाव्या आणि उजव्या विचारसरणीबद्दल खूप काही ऐकलं आहे. पण यापैकी कोण बरोबर, कोण चूक हे मी सांगू शकत नाही. द काश्मीर फाइल्समध्ये काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार, त्यांचा नरसंहार दाखवला आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्या कशा झाल्यात, ते दाखवलं आहे. काही वर्षांपूर्वी गाईची तस्करी करणाऱ्या एका मुस्लिम चालकाला बदडून ठार मारण्यात आलं होतं आणि यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. ही सुद्धा धर्माच्या नावावर झालेली हत्या आहे. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.’ तिच्या याच वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर नवा वादसाई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर काही लोक तिचा सपोर्ट करत आहेत तर काहींनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचं आहे,’ असं एका युजरने म्हटलं आहे. ‘साई पल्लवी एक हुशार मुलगी आहे, असं मी समजत होते. पण तिने मला निराश केलं. अशी मूर्खपणे तुलना करून तिने ती किती मूर्ख आहे, हे दाखवलं. मला वाटतं हा मूर्खपणा स्टारडमसोबतच येत असावा,’ अशा शब्दांत एका युजरने तिच्यावर टीका केली. याऊलट ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत,’ अशा कमेंट करत अनेकांनी साईला पाठींबा दिला.
‘Virata Parvam’ या आगामी चित्रपटात सई एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. यात तिच्यासोबत राणा डग्गुबत्ती मुख्य भूमिकेत आहे. हा तेलुगु चित्रपट 17 जून रोजी प्रदर्शित होत आहे.