टेलिव्हिजन आणि बॉलिवूडच्या जगतात संस्कारी बाबू अशी प्रतिमा असणारे अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. त्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आलोक नाथ यांच्याविरोधात तीव्र राग व्यक्त केला. त्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
सई ताम्हणकरने ट्विटरवर आलोकनाथ यांना उद्देशून लिहिले की, 'तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार'. अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली होती. आलोक नाथ प्रकरणावर सईने प्रतिक्रिया दिल्यानंतर नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादावर ती काय बोलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सईने एका वर्तनापत्राच्या मुलाखतीत नाना-तनुश्री वादावर आपले मत नोंदवले आहे. तिने सांगितले आहे की, नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने जे काही आरोप केले आहेत, ते ऐकून मला नक्कीच धक्का बसला आहे. तिच्या आरोपात तथ्य असल्यास नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मला नक्कीच वाटते.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतला आहे. इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंंड फुटतेय. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद, गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत.
बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळी या मोहिमेचे स्वागत करत आहेत. फरहान अख्तर, ट्विंकल खन्ना यांसारखे बॉलिवूडमधील मंडळी तनुश्री दत्ताच्या पाठिमागे उभे राहिले आहेत. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणावर मराठी इंडस्ट्रीने सुरुवातीला मौन पाळणेच पसंत केले होते. पण आता जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर सारखे कलाकार यावर आपले मत व्यक्त करत आहेत.