बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार ( Dilip Kumar )आज आपल्यात नाहीत. गतवर्षी त्यांचं निधन झालं. दिलीप कुमार यांच्या निधनानं त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu ) यांना मोठा धक्का बसला होता. अद्यापही त्या यातून सावरू शकलेल्या नाहीत. दिलीप कुमार यांचं नाव ऐकताच त्यांचे डोळे पाणावतात. नुकताच दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’(मरणोत्तर ) पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्यांना अश्रू अनावर झालेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात सायरा बानो दिलीप कुमार यांच्या आठवणीत रडताना दिसत आहेत.
मुंबईत एका इव्हेंटमध्ये दिलीप कुमार यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्त२ सायरा बानो यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना सायरा बानो भावुक झाल्यात. रामदास आठवले यांनी दिलीप कुमार यांचं स्मरण करताच सायरा बानोंना अश्रू अनावर झालेत. मी दिलीप साहेबांचं नाव ऐकलं की भावुक होते. यामुळेच मी कोणत्या इव्हेंटमध्ये जायचं टाळते, असं सायरा म्हणाल्या.याप्रसंगी मीडियाशी बोलताना सायरा यांनी दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. ‘दिलीप साहेब हिंदुस्तान के कोहिनूर होते. त्यांना भारतरत्न मिळायला हवा,’असं त्या म्हणाल्या.
ते नेहमी माझ्यासोबत...दिलीप साहब आत्ताही इथे आहेत. फक्त माझ्या आठवणीत नाहीत तर माझ्या प्रत्येक पावलासोबत ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी माझं उर्वरित आयुष्य काढू शकते. ते आता माझ्यासोबत नाही, असा विचार मी कधीच करत नाही. ते माझ्या जवळ आहेत आणि माझी हिंमत बनून माझ्यासोबत राहतील, असं सायरा म्हणाल्या.गतवर्षी 7 जुलैला दिलीप कुमार यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते आजारी होते.