सायरा बानो (Saira Banu) यांच्याकडे एक अनमोल ‘कोहिनूर’ होता आणि हा ‘कोहिनूर’ त्यांनी शेवटपर्यंत प्राणपणाने जपला. होय, हा ‘कोहिनूर’ कोण तर पती दिलीप कुमार.दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत सायरा त्यांच्यासोबत राहिल्या. अगदी त्यांची सावली बनून त्यांच्यासोबत जगल्या. दिलीप कुमार दीर्घकाळापासून आजारी होते. सायरांनी त्यांनी अगदी लहान बाळासारखी काळजी घेतली. त्यांची सेवा केली.दिलीप कुमार ही परमेश्वराने मला दिलेली मोठी भेट आहे, असे सायरा प्रत्येक मुलाखतीत सांगत. दिलीप कुमार यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी सायरा रोज त्यांची दृष्ट काढत. खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. (Saira Banu Dilip Kumar Love Story )
सायरा म्हणाल्या होत्या की,‘ लहानपणी दिलीप कुमार खूप गोंडस दिसायचे. त्यांना लवकरच दृष्ट लागायची. त्यामुळे त्यांची आजी आणि आई रोज त्यांची दृष्ट काढायच्या. दिलीप साहेबांना 15 वर्षे दृष्ट लोकांपासून वाचवावे लागेल, असे एका फकीराने त्यांच्या आई व आजीला सांगितले होते. त्यांनी 15 वर्षे दिलीप साहेबांना त्यांच्या पद्धतीने जपले. त्यांची पद्धत वेगळी होती. माझी जरा वेगळी. माझ्या कोहिनूरला दृष्ट लागू नये म्हणून मी सुद्धा काळजी घेते. मी गरिबांना धान्य, कपडे व गरजेच्या वस्तू वाटते...’सायरा उण्यापु-या 8 वर्षांच्या होत्या. तेव्हापासूनच त्या दिलीप यांच्यावर प्रेम करत होत्या. 1952मध्ये रिलीज झालेल्या दाग चित्रपटात दिलीप यांना पाहताच क्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना मात्र त्यांच्या आणि सायरा यांच्यात असणा-या वयाच्या अंतराबाबत ठाऊक होतं. लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या सायराची समजूत घालण्यासाठी दिलीप सायराला म्हणालेही होते की, तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का? पण सायराने दिलेल्या उत्तरावर दिलीप यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. त्यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला होता.