Sairat Director Nagraj Manjule House Inside Photos : झालं..झिंगझिंग...झिंगाट..झिंगझिंग..झिंगाट..! हे गाणं कानांवर पडताच 'सैराट' आठवतो. पाठोपाठ आठवतात ते आर्ची, परश्या अन् नागराज मंजुळे. होय, दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या या सिनेमानं अख्ख्या महाराष्ट्राला याडं लावलं. त्यांच्या फ्रँडी या पहिल्या सिनेमाचंही भरपूर कौतुक झालं. पण 'सैराट'ने नागराज यांनी अफाट लोकप्रियता मिळवून दिली. आज नागराज हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. अगदी आमिर खान सारखा बॉलिवूडचा दिग्गज अभिनेताही नागराज अण्णांच्या प्रेमात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी अतिशय गरीब कुटुंबात नागराज यांचा जन्म झाला. आज नागराज अण्णांकडे नेम फेम सगळं काही आहे. पण तरिही या माणसानं आपली गावासोबतची नाळ कधी तुटू दिली नाही.
गावाकडचं वडिलोपार्जित घर त्यांनी जसंच्या तसं जपलं आहे. आजही गावी गेल्यावर नागराज मंजुळे याच घरात राहातात. सैराटनंतर नागराज यांनी आपल्या या वडिलोपार्जित घराला नवं रूप दिलं खरं. पण वडिलांच्या कष्टाचं प्रतिक असलेल्या या घरातील घरपण त्यांनी जपलंय.
जेऊर या गावात नागराज लहानाचे मोठे झालेत. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचा भाऊ बाबूराव यांनी नागराज यांना दत्तक घेतलं. नागराज यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी ते अनेकवेळा शाळेला देखील दांडी मारत असत. नागराज यांच्या घरात कुणीच जास्त शिकलेलं नव्हतं. शालेय शिक्षणानंतर नागराज यांना काही मित्रांची वाईट संगत लागली. ते व्यसनांच्या ही आहारी गेलेत. मात्र, नंतर हे सर्व सोडून ते पुन्हा शिक्षणाकडे वळले. याकाळात त्यांना पुस्तके वाचण्याचा आणि कविता लेखनाचा छंद लागला होता. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला गेले. नंतर त्यांनी मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल पूर्ण केलं. मात्र, चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. 'पिस्तुल्या' हा पहिला लघुपट त्यांनी साकारला. या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. इथूनच खरं त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती.