‘सैराट’मध्ये (Sairat) बिनधास्त आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) खऱ्या आयुष्यातही एकदम बिनधास्त आहे. याच बिनधास्त रिंकूची एक बिनधास्त मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. होय, या मुलाखतीत रिंकूला दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नही साधासोपा नाही तर अगदी धर्मसंकटात टाकणारा. पण रिंकूने या प्रश्नाला अगदी बिनधास्त उत्तर दिलं.
नुकतंच रिंकूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट रिलीज झाला. यामध्ये रिंकूने अॅसिड हल्ल्यातील पीडितेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रिंकूने ‘ मराठी किडा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. तिची ही मुलाखत सध्या व्हायरल होतेय. या मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावरचं रिंकूचं उत्तर याची सर्वाधिक चर्चा होतेय.
नागराज मंजुळे यांच्या पाच अशा गोष्टी सांग ज्या तुझ्या डोक्यात जातात? असा प्रश्न या मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आला. यावर रिंकू खूप वेळ विचार करते आणि अशी एकही गोष्ट नसल्याचं सांगते. त्यांनंतर पुन्हा तिला फोर्स केल्यावर ती म्हणते, ‘ते कोणाचंच ऐकून घेत नाहीत ते आपल्या मतावर ठाम असतात. ते म्हणतात तेच खरं असं असतं.... हे डोक्यात नाही जात. पण आम्ही सगळे मिळून हे फक्त बघत असतो.’ अर्थात यानंतर लगेच ती विषय सांभाळते. ‘अण्णांना माहिती आहे मी हे फक्त तुमच्या या मुलाखतीसाठी बोलत आहे. हे काही खरं नाहीये,’ असं ती म्हणते.
डोक्यात जाणाऱ्या सोड, पण अण्णांच्या हृदयात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या? असं विचारल्यावर रिंकू म्हणते, ‘तो खरंच खूप साधा आहे. त्याला आपण जीव लावला की तोही आपल्यावर तितकाच जीव लावेल. तो दिग्दर्शक म्हणून अत्यंत हुशार आहे आणि एक कवी म्हणून कुणीही त्याच्या प्रेमात पडेल.’
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू रातोरात स्टार झाली. या चित्रपटाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला की, रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजघडीला रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही ती झकळली आहे.