ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ : ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘फॅन’यासारख्या लोकप्रिय चित्रपटांवर मात करीत ‘विरसनाई’ या तामिळ चित्रपटाची सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या श्रेणीत ‘आॅस्कर’वारीसाठी भारतीय चित्रपट महासंघाने (एफएफआय) निवड केली आहे. अभिनेता धनुष निर्मित या चित्रपटाने यावर्षी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत.
या स्पर्धेत ‘सैराट’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सुल्तान’, ‘फॅन’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘उडता पंजाब’सह २९ चित्रपट होते. तथापि, ‘विरसनाई’ या तामिळ चित्रपटाची सर्वानुमते ‘आॅस्कर’वारीसाठी निवड करण्यात आली, असे भारतीय चित्रपट महासंघाचे अध्यक्ष केतन मेहता यांनी सांगितले. एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक-अप’ या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट असून, वेत्रीमारन दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत.
अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणारा ‘विसारानाई’ या तामिळ चित्रपटाची निर्मिती अभिनेता धनुषने केली असून तो एक क्राईम-थ्रिलर सिनेमा आहे. वेत्रिमारन दिग्दर्शित हा चित्रपट एम. चंद्रकुमार यांच्या लॉक अप या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात पोलिसांचे क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निर्दोष व्यक्तींचा अन्यायाविरूद्धचा संघर्ष दाखवला आहे. खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आलेल्या चार निरपराध मजुरांच्या लढ्याची ही कथा आहे. ५ फेबु्रवारीला तामिळनाडूत हा चित्रपट रिलीज झाला होता आणि प्रेक्षक, समीक्षकांनी तो डोक्यावर घेतला. यंदाच्या ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन पुरस्कार पटकावले होते. आॅस्करवारीसाठी निवड झाल्याने ‘विसारानाई’ची अख्खी टीम आनंदात आहे. धनुष याने हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत सन्मानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गतवर्षी ‘कोर्ट’ हा मराठीपट आॅस्करवारीसाठी गेला होता. यंदा ‘विसारानाई’ या तामिळपटाची आॅस्करवारीसाठी निवड झाली आहे.