Join us

डंकी Vs सालार : चाहत्यांमधील सोशल मीडिया 'वॉर'वर दिग्दर्शक प्रशांत नील काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:05 PM

'डंकी' हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि प्रभासचा  'सालार'हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला.

किंग खान शाहरुखचा ‘डंकी’ आणि साऊथ सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले आहेत. 'डंकी' हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि प्रभासचा  'सालार'हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला. दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर तर झालीच. पण, दोघांच्या चाहत्यांमध्येही भांडण सुरू झाले. आता दिग्दर्शक प्रशांत नील यांनी 'डंकी' विरुद्ध 'सालार'वर प्रतिक्रिया दिली. 

प्रशांत नील म्हणाले, 'सिनेमात असंच घडतं, आवडत्या अभिनेत्यासाठीविषयी असलेल्या भावना प्रेक्षकांना भारावून टाकतात. चाहत्यांसाठी ही एक टक्कर असू शकते. परंतु स्पर्धा करण्याचा नाही तर आम्ही टिकण्याचा प्रयत्न करत आहोत. मी अशा कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत नाही'.

पुढे ते म्हणाले, 'मी जे ऐकले त्यावरून ते खूप वाईट आहे. असे होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण, ते दोघेही भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार आहेत वर्षानुवर्षे कमावलेल्या सन्मानाला ते पात्र आहेत. हे सगळं वातावरण सिनेमासाठीही चांगलं नाही.  त्याकडे दुर्लक्ष करावं. कारण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही'.

'डंकी' आणि 'सालार' बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहेत.  हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'सालार'ने पहिल्याच दिवशी ९० कोटींचा गल्ला जमवला होता. तर 'डंकी'नेही पहिल्या दिवशी २९ कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. पहिल्याच आठवड्यात डंकीने १६० कोटींचा गल्ला जमवला. 

'सालार' सिनेमात प्रभासबरोबर श्रुती हसनही मुख्य भूमिकेत आहे. तर पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू रेडी, टीनू देसाई या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर 'डंकी' मध्ये शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणींनी केलं आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीबॉलिवूडTollywoodप्रभासशाहरुख खान