Join us

क्रिकेट सट्टा प्रकरणात सलीम खानचा समावेश? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 8:33 AM

सोनूने दिलेल्या या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : क्रिकेट सट्टा प्रकरणात अरबाजचे वडील सलीम खान यांचं नावही समोर आलं आहे. बुकी सोनू जलानने याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. सलीम खान पूर्वी सट्टा लावत होते, मात्र ते आताही सट्टा लावतात का हे माहित नसल्याचं सोनू जलानने म्हटलं आहे. मात्र सोनूने दिलेल्या या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे न्यायालयाने बुधवारी क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी सोनू जालाना याची पोलीस कोठडी रविवारपर्यंत वाढवली आहे.

क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळणाऱ्या टोळीची माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने आतापर्यंत टोळीतील आठ आरोपींना अटक केली. क्रिकेटवर जगभरातून सट्टा घेणारा आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोनू जालानचे बॉलिवूड जगताशी असलेले संबंध तपासादरम्यान उघडकीस आले. 

अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान याचीही खंडणीविरोधी पथकाने चौकशी केली. अरबाज खान हा सोनू जालानच्या काही महत्त्वाच्या ग्राहकांपैकी एक होता. तो सोनूकडे नियमित सट्टा खेळायचा. पैशांचा हिशेब ते अधूनमधून करायचे. सट्ट्याचा हिशेब बरेच दिवसांपासून केला नसल्याने मध्यंतरी अरबाजचा सोनूशी वाद झाला. अखेर, हा विषय संपवण्यासाठी तो सोनू जालानच्या कार्यालयावर गेला. सोनने सुमारे पावणेतीन कोटी घेणे असल्याचे सांगितले. एवढी रक्कम हरलोच नसल्याचे अरबाजने त्याला सांगितले. यातून दोघांमध्ये खटके उडाले. काही दिवसांनी हा वाद मिटला. मात्र, त्या काळात सोनूच्या प्रत्येक सूचनेचे अरबाज पालन करायचा. त्यामुळे त्याला सोनूने हनी ट्रॅपमध्ये अडकवले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासही केला. मात्र, तसा पुरावा मिळाला नसल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या अधिका-यांनी सांगितले. प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान हेदेखील सोनूकडे नियमित सट्टा लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.