राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेत सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाबा सिद्दिकी आणि सलमान जवळचे मित्र होते. त्यामुळेच बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. यावर आता पहिल्यांदाच सलमानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सलमानने काळवीट प्रकरणावरुन बिश्नोई समाजाची माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिश्नोईने केली होती. मात्र, सलमानने असं कोणतंच कृत्य केलेलं नाही. तर तो माफी का मागेल, असं सलीम खान यांचं म्हणणं आहे. सलीम खान यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "ना मी कोणत्या प्राण्याची हत्या केली आहे. ना सलमानने केली आहे. आम्ही कधी साधं झुरळही मारलेलं नाही. मी सलमानला विचारलं होतं की हे कोणी केलं आहे. त्याने मला सांगितलं होतं की तो तिथे नव्हताच. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो कारमध्येही नव्हता. आणि तो माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. आमच्याकडे बंदूकही नाहीये.सलमानला प्राण्यांना वगैरे मारण्याचा शौक नाही. तो प्राण्यांवर प्रेम करतो".
"माफी मागा असं त्यांचं म्हणणं आहे. पण, कोणाबरोबर आपण काही चुकीचं केलं असेल, तर माफी मागणार. जीवन आणि मृत्यू देवाच्या हातात आहे. जर यांच्या हातात असेल, तर बघू. बाबा सिद्दिकींच्या हत्येत लॉरेन्सचा हात असला तरी त्याचा सलमानशी काही संबंध नाही. सलमानचा मित्र असल्याने सिद्दिकींची हत्या झालेली नाही", असंही सलीम खान म्हणाले.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावेळी त्याच्याकडे ५ कोटींची मागणीही करण्यात आली आहे. बिश्नोईच्या धमक्यांना न जुमानता सलमानने कडक सुरक्षा आणि चोख बंदोबस्तात बिग बॉसचं शूटिंग पूर्ण केलं.