बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. रविवारी(१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपासही पोलीस करत आहेत. या प्रकरणानंतर आता पहिल्यांदाच पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'एएनआय'शी बोलताना पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे. "दोन व्यक्ती सकाळी ५च्या सुमारास बाईकवरुन आल्या आणि त्यांनी घराबाहेर हवेत गोळीबार केला. त्यानुसार आम्ही FIR दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे. ४-५ वेळा हवेत गोळीबार करण्यात आला. फॉरेंसिक टीमही घटनास्थळी आहे. आमच्या १५पेक्षा अधिक टीम यावर तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही," अशी माहिती मुंबईचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे.
दरम्यान, गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानला फोन केल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंनी सलमान खानला फोन करून विचारपूस केल्याची माहिती एएनआयने दिली आहे. सलमानच्या घराबाहेर नेमकं गोळीबार कुणी केला, याबाबत पोलीस तपास करत आहे. पण, सलमान खानला याआधीही अनेका जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका टेलिव्हिजन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे.