Bigg Boss And Khatron Ke Khiladi: टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त लोकप्रिय असेलले दोन रिअॅलिटी शो म्हणजे सलमान खानचा 'बिग बॉस' आणि रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी'. या दोन्ही शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'बिग बॉस'चे आतापर्यंत तब्बल १८ पर्व पुर्ण झालेत. तर 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोचे १४ पर्व यशस्वीरित्या पार पडलेत. हे दोन्ही गेल्या अनेक वर्षांपासून कलर्स वाहिणीवर प्रसारित होत आले आहेत. पण, आता यामध्ये मोठा बदल झाला आहे. या शोचे पुढील पर्व हे कलर्सवर नाही तर दुसऱ्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.
कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' शोचं चॅनेल बदलण्याचा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे घेण्यात आला आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी'ची निर्मिती बानीजे एशिया (एंडेमोल शाइन इंडिया) यांनी केली आहे. या दोन्ही शोचे ग्लोबल प्रोडक्शनचे हक्क त्यांच्याकडे आहेत. कलर्स (व्हायकॉम १८) आणि एंडेमोल शाइन इंडियामध्ये गेल्या काही काळापासून मतभेद आहेत. चॅनेल शोच्या स्वरूपासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असल्यानं मतभेद वाढले आणि त्यामुळे दोन्ही शोच्या निर्मात्यांनी चॅनल बदलण्याचा निर्णय घेतलाय.
चॅनल बदलल्यामुळं हे रिअॅलिटी शो आता कलर्स वाहिणीवर नाही तर सोनी टीव्हीवर प्रसारित होणार असल्याचा रिपोर्ट झुमनं दिला आहे. शोचे निर्माते आणि सोनी चॅनल यांच्यातील चर्चा व्यवस्थित पार पडल्यास हे शो सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
दरम्यान, 'खतरों के खिलाडी' पुर्वी सोनी टीव्हीवर प्रसारित व्हायचा. २००८ मध्ये पहिल्यांदाच सोनी टीव्हीवर 'खतरों के खिलाडी' हा शो 'फियर फॅक्टर' या नावाने प्रसारित झाला होता. नंतर त्याचं स्वरूप बदललं. कलर्स वाहिनीवर 'खतरों के खिलाडी' या नावाने हा शो खूप लोकप्रिय झाला. आता पुन्हा एकदा स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो सोनी टीव्हीवर पाहता येईल. आतापर्यंत रोहित शेट्टीच्या या रिअॅलिटी शोचे तब्बल १४ पर्व यशस्वी पूर्ण झालेत. आता लवकरच 'खतरों के खिलाडी' चं १५वं पर्व येणार आहे.