सलमान खानचा आज म्हणजेच 27 डिसेंबरला वाढदिवस असून तो प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. त्याने बिवी हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने सहकलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर तो मैंने प्यार किया या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवले. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, साजन, वाँटेड, दबंग, एक था टायगर, बजरंगी भाईजान यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले आहेत. सलमानचा आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात.
सलमान खानच्या फिल्मी करियरची जितकी चर्चा मीडियात रंगते, तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील रंगते. सलमानचे नाव आजवर संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलेले आहे. संगीता बिजलानीसोबत तर सलमान लग्न देखील करणार होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आलेल्या होत्या. पण काही कारणास्तव हे लग्न होऊ शकले नाही. संगीतानंतर सलमानच्या आयुष्यात सोमी अली आली.
सोमी मुळची पाकिस्तानची. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला बॉलिवूडमध्ये करियर करायची इच्छा होती. पण बॉलिवूडमध्ये करियर करण्यामागे तिचा हेतू सलमान खानला भेटणे हा होता. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’हा चित्रपट पाहिल्यापासूनच सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने पक्कं ठरवलं होते. सोमीचे अभिनयाबाबत असलेले प्रेम पाहाता तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमानला भेटण्यात अधिक रस होता. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.
मुंबईत आल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. मॉडलिंग करत असतानाच ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी संधी शोधत होती. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर सलमानपर्यंत पोहोचणे सोपे असल्याचे तिला वाटत होते. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली. चित्रपटात काम करायला मिळाल्यानंतर तिला सलमानला भेटण्याची संधी मिळाली. एका मुलाखतीत सोमीने हा सगळा प्रवास सांगितला होता. सलमान माझा पहिला बॉयफ्रेन्ड होता. त्याच्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आली. त्याच्याकडून मी खूप काही शिकले. आज मी जे काही आहे, ते त्याच्याचमुळेच असेही ती म्हणाली होती.
सलमान आणि सोमी आठ वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे मुख्य कारण होते, ऐश्वर्या रायसोबत सलमानची वाढलेली जवळीकता. ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. तिनेच याबद्दल सांगितले होते. २०११ मध्ये मी सलमानला भेटले होते. त्यावेळी मी बँकॉकमध्ये होते. सलमानही एका शूटींगसाठी तेथे आला होता. आम्ही भेटलो. खूप गप्पा मारल्या. पण आता आम्ही आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत, असे तिने सांगितले होते.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. तिथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीत प्रवेश घेतला आणि महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था उभारली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. आजही सोमी कदाचित सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच तिने अद्याप लग्न केलेले नाही.