अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा टायगर 3 हा चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान खानने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. सकाळी सहा वाजता या चित्रपटाचा शो हाऊसफुल्ल झाला होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीच्या एंट्रीवर थिएटरमध्ये लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. एवढच नाही तर चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाकेही फोडले.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाईजानचे चाहते थिएटरमध्ये फटाके फोडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान खानच्या एन्ट्रीचा सीन स्क्रीनवर दिसत आहे, जो पाहिल्यानंतर चाहते थिएटरच्या आत फटाके फोडत आहेत. फटाक्यांचा धूर पाहायला मिळत आहे. काही लोकांनी घाबरून आपल्या जागेवरून पळ काढला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, 'नेमकं काय होतं आहे? हे लोक थिएटरमध्ये इतके फटाके घेऊन गेले कसे? तर दुसर्याने लिहिलं आहे की, हा निष्काळजीपणा आहे. कुणाला काही झालं तर याला जबाबदार कोण? तर दुसऱ्याने 'काय करू भाऊ, क्रेझच अशी आहे' असं लिहिलं आहे.