अभिनेता सलमान खानला (Salman Khan) नुकतीच पुन्हा धमकी आली. बाँबने गाडी उडवू अशा धमकीचा फोन वरळी पोलिसांना आला. गेल्या वर्षभरापासून सलमानच्या जीवाला धोका आहे. सतत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत. या धमक्यांमध्येही नुकताच सलमानचा 'सिकंदर' रिलीज झाला. पूर्ण सुरक्षेसह त्याने शूटिंग पूर्ण केलं होतं. सलमानच्या शरीरयष्टीवरुन तो बऱ्याचदा ट्रोल होत आहे. मात्र आता त्याने बायसेप्स दाखवत फोटो शेअर केला असून ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
सलमान खानने नुकताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये भाईजान बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याची बॉडी पाहून सगळे थक्कच झालेत. 'प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद' असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. जिममध्ये तो अक्षरश: घाम गाळत असून शरीरावर मेहनत घेत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो काहीसा थकलेलाही दिसतोय. वयाच्या ५९ व्या वर्षीही त्याची ही फिजिक पाहून चाहतेही अचंबित झालेत. 'टायगर अभी जिंदा है' असाच काहीसा मेसेज त्याने या पोस्टमधून दिला आहे.
भाईजानच्या या पोस्टवर वरुण धवन, राघव जुयाल यांनी कमेंट केली आहे. तर रणवीर सिंहनेही 'हार्ड हार्ड' कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. सलमान खानचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र सध्या त्याचे सिनेमे फारसे चालताना दिसत नाही. 'सिकंदर'ही चांगलाच आपटला. आता तो आगामी 'टायगर व्हर्सेस पठाण','किक २', आणि संजय दत्तासोबत पुढील सिनेमात दिसणार आहे.