आपला शेजारी देश पाकिस्तानात सध्या नैसर्गिक आपत्ती पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात शतकातील महापूर आला आहे. या पुरामुळे आत्तापर्यंत 1000 वर लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 3 कोटी लोकांचे संसार वाहून गेले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या सरकारने मदतीचे आवाहन केले आहे. अशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी पाकिस्तानातील या नैसर्गिक आपत्तीवर दु:ख व्यक्त करत, ट्वीट केलं आहे. खरी बातमी पुढे आहे. मोदींच्या या ट्वीटवर बॉलिवूडचा निर्माता व अभिनेता निखील द्विवेदीनं ( Nikhil Dwivedi) खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे.
मोदींचं ट्वीटपाकिस्तानाच पूराचा कहर पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘पाकिस्तानातील पूरामुळे झालेलं नुकसान पाहून दु:ख झालं. आम्ही पीडित, जखमी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांच्या कुुटुंबाप्रती आपल्या हार्दिक संवेदना व्यक्त करतो आणि तेथील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल, अशी आशा करतो,’असं ट्वीट मोदींनी केलं. मोदींचं हे ट्वीट राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग आहे. पण या ट्वीटनंतर निखील द्विवेदीनं मोदींना जोरदार टोमणा मारला आहे.
निखील म्हणाला...‘सर, चांगलं ट्वीटआहे. अगदी राजकीय नेत्याला शोभेल असं. पाकिस्तान एक शत्रू राष्ट्र आहे, पण अशावेळी सच्चे नेते कटुता विसरतात. सर, असंच वातावरण असायला हवं... आमिर खान, सलमान खान, शाहरूख खान, सैफ अली खान किंवा मग अन्य कुणालाही असंच ट्वीट करण्याचं स्वातंत्र्य असावं....,’असं निखील द्विवेदीने लिहिलं. या ट्वीटनंतर निखील द्विवेदी जबरदस्त ट्रोल होतोय. ‘खान्स कडून तिकडे मदत पोहोचली आहे, तू चिंता करू नकोस,’ अशी खोचक कमेंट एका युजरने केली आहे. ‘म्हणून बॉलिवूडला बायकॉट केलं जात आहे’, असं एकाने लिहिलं आहे. ‘तुझ्या खान मित्रांनी कधीच दहशतवादावर पाकिस्तानची निंदा केली नाही,’ असं एका युजरने निखीलला सुनावलं आहे.
कोण आहे निखील द्विवेदी?43 वर्षाचा निखील द्विवेदी बॉलिवूडचा अभिनेता व निर्माता आहे. सोबत तो सलमान खानचा जिगरी यार आहे. रावण, शोर इन सिटी, हेट स्टोरी अशा अनेक चित्रपटात त्याने काम केलं आहे. याशिवाय वीरे दी वेडिंग, दबंग 3 सारखे सिनेमे प्रोड्यूस केले आहेत.