Join us

'कबूतर जा जा' गाण्याचं शूट करताना रडला होता सलमान खान, ३५ वर्षांनी सांगितलं नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:28 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानने या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. 'कबुतर जा जा' गाणं शूट करताना रडू आल्याचा खुलासा सलमानने केला.

एक असा काळ होता जेव्हा प्रेमकथांनी बॉलिवूड बहरलं होतं. ८०-९०च्या दशकात अनेक हटके लव्हस्टोरी असलेले सिनेमे प्रदर्शित झाले होते. या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे 'मैंने प्यार किया'. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सुमन आणि प्रेम यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली होती. सलमान खान आणि भाग्यश्री या सिनेमात मुख्य भूमिकेत होते.

केवळ सिनेमाच नाही तर 'मैंने प्यार किया' सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरली होती. 'आजा शाम होने आई', 'दिल दिवाना', 'कबुतर जा जा' ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 'कबुतर जा जा' हे गाणं आजही अंताक्षरी असू दे किंवा आणखी काही...चाहत्यांच्या ओठांवर असतंच असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानने या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. 'कबुतर जा जा' गाणं शूट करताना रडू आल्याचा खुलासा सलमानने केला. सलमानने नुकतीच हॅलो इंडो अरेबियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला फेव्हरेट सिनेमा कोणता याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना सलमानने 'मैंने प्यार किया' सिनेनाचं नाव घेत एक किस्सा सांगतिला. 

सलमान म्हणाला, "मी तेव्हा १८ वर्षांचा असेन. 'कबुतर जा जा जा' गाण्याचं शूटिंग करताना मला अचानक जाणवलं की ही भूमिका तर माझ्यासाठीच आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टचं वाचन करताना मला डोळ्यासमोर या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरच दिसायचे. एवढ्या मोठ्या सिनेमात प्रमुख भूमिकेत असण्याची कल्पनाच मी करू शकत नव्हतो. पण, तेव्हा पहिल्यांदा मला जाणवलं की मी हे करू शकतो. तेव्हा मी भावुक झालो होतो. आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते". 

'मैंने प्यार किया' सिनेमामुळे केवळ सलमानच नाही तर भाग्यश्रीलाही स्टारडम मिळवून दिलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. ८०च्या दशकातील हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. या सिनेमाने सलमान खानला स्टार बनवलं होतं. 

टॅग्स :सलमान खानभाग्यश्रीसिनेमा