सलमान खानने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोहनिश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल.
सलमानने आजवर सुनील शेट्टीची मुलगी अथिया, आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज, सलमानचा मेहुणा आयुष शर्मा यांना लाँच केले आहे आणि आता तो प्रनूतन बहलला लाँच करत आहे. याबाबत त्याला नोटबुकच्या ट्रेलर लाँचच्या वेळी विचारले असतो तो सांगतो, मी सगळ्यांनाच लाँच करतो असे नाही. जे खरंच योग्य आहेत त्यांचीच मी अचूक निवड करतो.
तुम्हाला माहीत आहे का, प्रनूतन बहलला लाँच करणाऱ्या सलमान खानने तिच्या वडिलांना म्हणजेच मोहनिश बहलला देखील मदत केली होती. सलमान आणि मोहनिश हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे पूर्वी एकाच जीमला जात असत. त्यांच्या या मैत्रीविषयी सलमान सांगतो, आम्ही एकत्रच जीमला जायचो. एकदा आम्ही व्यायाम करत असताना मोहनिश मला म्हणाला होता की, मला चांगला ब्रेक मिळावा याची मी रोज देवाकडे प्रार्थना करत आहे. त्यावर तुला लवकरच चांगला ब्रेक मिळेल असे मी त्याला नेहमीच म्हणायचो आणि त्यानंतर तेरी बाहों में हा मोहनिशचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो गाजला.
एवढेच नव्हे तर मैंने प्यार किया या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी मोहनिशचे नाव सलमाननेच सुचवले होते. तो सांगतो, राज बाबू (राजकुमार बडजात्या) यांनी मला या चित्रपटासाठी साईन केल्यानंतर या चित्रपटात एका नकारात्मक भूमिकेसाठी ते एका कलाकाराच्या शोधात आहे हे मला कळले. त्यावर मी मोहनिशचे नाव त्यांना सुचवले होते. मोहनिशची आई प्रसिद्ध अभिनेत्री नुतन या असल्याने मोहनिशला नकारात्मक भूमिका मी कशी देऊ असा प्रश्न राज बाबू यांना पडला होता. त्यावेळी मी नूतनजी यांना भेटलो आणि त्यांनी राज बाबू यांना भेटून मोहनिश ही भूमिका करेल असे सांगितले.