अभिनेता सलमान खानला(Salman Khan) अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून धमक्या मिळाल्या आहेत. काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स सलमानच्या मागेच लागला आहे. परवा सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर दोन गुंडांनी गोळ्या झाडल्या. लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईने हल्ल्याची जबाबदारीही घेतली. हे गँगस्टर आता सलमानच्या अगदीच जवळ आले आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यालाही धमक्या आल्या होत्या. इतकंच नाही तर त्याला थेट छातीत गोळी लागली होती.
2000 साली आलेला 'कहो ना प्यार है' सिनेमा. या सिनेमातून अभिनेता हृतिक रोशन आणि अमिषा पटेलने पदार्पण केले होते. हृतिकचे वडील आणि अभिनेते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनीच सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. हृतिकचे लुक्स, डान्स, लव्हस्टोरी सगळंच प्रेक्षकांना प्रेमात पाडणारं होतं. या सिनेमाने जोरदार कमाई केली होती. 10 कोटी बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने 80 कोटींचा गल्ला जमवला होता. सिनेमाच्या कमाईवर अंडरवर्ल्डचा डोळा होता. अंडरवर्ल्डला सिनेमाच्या परदेशी कमाईचा 50 टक्के भाग हवा होता. राकेश रोशन यांनी स्पष्ट नकार दिला. सिनेमाच्या रिलीजनंतर सातच दिवसांनी राकेश रोशन यांच्यावर सांताक्रुझ परिसरात हल्ला झाला. यात त्यांना दोन गोळ्या लागल्या. एक गोळी थेट छातीत लागली होती. त्यांना ताबडतोब नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथे चंकी पांडे यांचे वडील डॉ शरद पांडे यांनी त्यांचे प्राण वाचवले.
बॉलिवूड अभिनेत्यांना धमक्या येणं, त्यांच्यावर हल्ले होणं हे काही नवीन नाही. मात्र आता सलमानच्या घरावरच थेट हल्ला झाल्याने सर्वच चिंतेत पडले आहेत. सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. असं असलं तरी शेड्युलनुसार काम सुरुच राहणार असं सलमान खानने त्याच्या टीमला सांगितलं आहे.