बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा रिलीज झाला. तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात त्याला गँगस्टर्सककडून मिळत असलेल्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सलमान लग्न कधी करणार हा तर नेहमीचा प्रश्न आहेच. तर या सर्व प्रश्नांवर सलमानने रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली आहे.
"किसी का भाई किसी की जान' च्या सेटवर सलमानने अभिनेत्रींच्या ड्रेसिंग स्टाईलवरुन नियम लावले होते, त्यांनी डीप नेकलाईनचे कपडे परिधान करु नये असं सलमान म्हणाला होता का? या प्रश्नावर उत्तर देत सलमान म्हणाला, 'माझे चाहते, तसंच अनेक लोक हे आपल्या कुटुंबासोबत सिनेमा बघायला येतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. यात डबल स्टँडर्ड असं काहीच नाही. मला वाटतं महिलांचं शरीर मौल्यवान आहे. ते जितकं झाकलेलं असेल तेवढं चांगलं आहे. मुलं ज्याप्रकारे मुलींकडे बहिणीकडे, आईकडे बघतात ते मला आवडत नाही."
तो पुढे म्हणाला,'माझा हाच प्रयत्न असेल की जेव्हा आम्ही सिनेमा बनवू तेव्हा आम्ही मुलांना ही संधी द्यायला नको की ते येऊन आमच्या अभिनेत्रींकडे त्या नजरेने बघतील." ओटीटी माध्यमावरही सेन्सॉरची गरज असल्याचं मत सलमानने यावेळी मांडलं.
सलमानचा लवकरच 'टायगर 3' हा सिनेमाही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यामध्ये शाहरुख खान 'पठाण'च्या रुपात कॅमिओ करताना पाहायला मिळणार आहे.