दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) काही वर्षांपासून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या गँगच्या निशाण्यावर आहे. दोन महिन्यांपूर्वी सलमानच्या मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटवर पहाटे गोळीबारही झाला. यावेळी सलमान घरातच होता. त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात आरोपींना अटकही केली. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील पाच आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली. सिद्धू मूसेवालासारखीच सलमानची हत्या करण्याचा त्यांचा प्लॅन होता असं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
चार्जशीटमध्ये काय आहे?
पोलिसांनी चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी काढली होती. आरोपी पाकिस्तानातून अत्याधुनिक हत्यार AK47, AK92 आणि M16 सोबतच तुर्की मेड जिगाना पिस्तुल खरेदी करण्याच्या तयारित होते. जिगाना हे तेच हत्यार आहे ज्याने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली होती.
सलमान खानला मारण्याचा प्लॅन ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 मध्ये रचण्यात आला होता. ६० ते ७० लोक सलमानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते. सलमानचं मुंबईतलं घर, पनवेल फार्महाऊस आणि गोरेगांव फिल्मसिटीमध्ये सलमानवर पाळत ठेवली जात होती. आरोपींनी १८ वर्षांखालील मुलांना ठेवले होते. सगळे शूटर गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोईच्या ऑर्डरची वाट पाहत होते. हे सर्व शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये लपले होते.