Join us

जणू काही फिल्मचा सीनच! विमानतळावर सलमानभोवती तगडी सुरक्षा; दुबईला रवाना झाला भाईजान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:34 PM

एखाद्या सिनेमाचा सीन वाटावा तसंच चित्र मुंबई विमानतळावर दिसत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) बांद्रा येथील घरावर गोळीबार झाला. या प्रकरणाला आता चार दिवस होऊन गेले आहेत. सलमानला Y+ सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. यानंतर आता सलमान खान पहिल्यांदाच मुंबईबाहेर जात आहे. यावेळी विमानतळावर सलमान खानसोबत तगडी सुरक्षा पाहायला मिळाली. एखाद्या सिनेमाचा सीन वाटावा तसंच चित्र मुंबई विमानतळावर दिसत होतं. 

सलमान खानचा आपला ब्रँड बीइंग स्ट्राँगच्या लाँचसाठी आज दुबईला रवाना झाला. मुंबई विमानतळावर येताच अभिनेता कारमधून उतरला तेव्हा त्याच्याभोवती तगडी सुरक्षा पाहायला मिळाली. त्याच्या वैयक्तिक सुरक्षारक्षक शेरा आणि त्याची टीम तर होतीच पण पोलिस जवानांचीही सुरक्षा आता दिसून आली. सलमानचं सामान उचलणारे वेगळे लोक सोबत होते. एकदम स्टायलिश अंदाजात तो कारमधून उतरला. पापाराझींनाही आता त्याच्या जास्त जवळ जाऊ दिलं जात नाहीए। दुरुनच सलमानचा व्हिडिओ काढला गेला. सलमाननेही सर्वांना हात दाखवला आणि तो आतमध्ये गेला. अगदी एअरपोर्ट अधिकाऱ्यांनीही त्याला पासपोर्ट, डॉक्युमेंट तपासण्यासाठी अडवलेलं दिसलं नाही. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सलमानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 'सलमान भाई सब गँगस्टर का बाप है','सलमानची पर्सनॅलिटी तर बघा' असं म्हणत चाहत्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे. तर काही जणांनी सलमानला ट्रोलही केलं आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना रविवारी(१४ एप्रिल) रोजी घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडमुंबईगोळीबारमुंबई पोलीस