बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ही करण-अर्जुनची जोडी लवकरच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. पण हा योग जुळून आला नाहीये. ते दोघे एकमेकांच्या अनेक चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. पण आता अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा ही जोडी एकत्र चित्रपटात झळकणार आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. सलमाननंतर आता या चित्रपटात शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा रंगली आहे.
सलमानने भन्साळींच्या ‘खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘सावरियां’सारख्या चित्रपटात काम केले आहे तर शाहरुखने त्यांच्या ‘देवदास’मध्ये अभिनय केला आहे. त्यामुळे सलमान आणि शाहरुख या दोघांचेही भन्साळी यांच्यासोबत खूपच चांगले संबंध आहेत. भन्साळी यांच्या चित्रपटासाठी सलमानने होकार दिल्यानंतर आता शाहरुखदेखील या चित्रपटाचा भाग बनणार असल्याचे म्हटले जात आहे.
संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट २०२० च्या ईदमध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय लीला भन्साळी प्रोडक्शनमधील प्रेरणा सिंग यांनी या चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले होते की, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यांच्या या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटात इतर कोण कलाकार असणार, तसेच या चित्रपटाची नायिका कोण असणार याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाहीये.
शाहरुख आणि सलमानची जोडी सगळ्यात पहिल्यांदा ‘करण-अर्जुन’मध्ये प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली होती. राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण-अर्जुन’ पुनर्जन्मावर आधारित एक हिट चित्रपट होता. हम तुम्हारे है सनम या चित्रपटानंतर ते आता कोणत्या चित्रपटासाठी एकत्र येणार याची फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.