बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला मिळत असलेल्या धमकीप्रकरणी एकाला राजस्थानमधूनअटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई करत जोधपूर येथून 21 वर्षीय धाकड राम बिश्नोईला अटक केली आहे. सलमानला काही दिवसांपासून ईमेलच्या माध्यमातून धमकी मिळत होती. याचं कनेक्शन थेट युकेशी होतं. आता या प्रकरणी पहिली अटक झाली आहे.
काळवीट शिकारप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला खुलेआम धमकी दिली होती. सलमानने माफी मागावी नाहीतर उत्तर मिळेल असा इशारा त्याने तुरुंगातूनच दिला होता. यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली. सलमानने धमकीप्रकरणी बांद्रा पोलिस ठाण्यात याआधीच तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान राजस्थानमधून पहिली अटक केली आहे.
सलमानला आलेल्या ईमेलमध्ये 'तेरा हाल भी सिद्धू मूसेवाला की तरह होगा.' अशी धमकी देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्याला हा ईमेल आला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली आहे. सलमानच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, 'मला या धमकीमुळे फरक पडत नाही, जे व्हायचं ते होईल' असं सलमान म्हणाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, राम बिश्नोईने सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनाही धमकीचे ईमेल पाठवले आहेत. त्याच्या विरोधात Arms Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. धाकड राम जोधपूर येथील लुनी जिल्ह्यातील रहिवासी होता. जोधपूर पोलिस आणि मुंबई पोलिसांनी मिळून ही कारवाई करत त्याला अटक केली.