ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - बॉलिवूडच्या किंग खानसोबत काम करण्याचे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते, पण बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. रांजना फेम दिग्दर्शक आनंद एल. राय हे अभिनेत्री दीपिका पादुकोन, कतरिना कैफ आणि शाहरूख खान यांना घेऊन चित्रपट करणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी स्वरा भास्करकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
अभिनेता सलमान खान आणि सोनम कपूरसोबत प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम करणाऱ्या स्वरा भास्करने फिल्मफेअर नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानसोबत काम करण्यास तिने का नकार दिला. याचे कारण तिने सांगितले की, मी शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटानंतर मी शाहरुख खानची फॅन आहे. आनंद राय यांनी मला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी विचारले होते. पण, त्यांनी मला शाहरुख खानच्या आईची भूमिका करण्यासाठी माझा विचार केला होता. मात्र, शाहरुख खानच्या बहिनीची अथवा मुलीची भूमिका असती तर मी केली असती, पण आईची भूमिका करण्यासाठी मी तयार नाही असे, तिने सांगितले.
याआधीही स्वरा भास्करने शाहरुख खानची आपण किती मोठी फॅन आहे, असे तिने खूप वेळा सांगितले आहे. अजून एका मुलाखतीच्यावेळी बोलताना ती म्हणाली होती, मला अभिनेत्री नाही तर शाहरुख खान बनायाचे आहे. मला शाहरुख खानसारखे स्टारडम हवे आहे. कोणीही स्टार बनू शकतो पण सलमान, शाहरुख, आणि आमिर खानसारखे 25 वर्ष आपले स्टारडम ठेवू शकत नाही.
आनंद एल राय सोबत स्वरा भास्करने रांजना चित्रपटात काम केले आहे. समीक्षकांनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक केले होते. गेल्या वर्षी स्वराचा नील बटे सन्नाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.