विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला 'सॅम बहादूर' सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. भारतीय लष्करातील मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. 'सॅम बहादूर' बरोबरच रणबीर कपूरचा 'ॲनिमल' सिनेमाही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. 'ॲनिमल'ची क्रेझ आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ठाण मांडून बसलेला असताना विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'ने मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
'सॅम बहादूर' बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या 'ॲनिमल'ला तगडी टक्कर देत आहे. बॉक्स ऑफिसवरील बिग बजेट सिनेमांच्या शर्यतीत 'ॲनिमल'ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात विकी कौशलचा 'सॅम बहादूर' डंका वाजवत आहे.'ॲनिमल'च्या दुनियेत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १७ दिवसांनंतरही 'ॲनिमल'ला 'सॅम बहादूर' तगडी टक्कर देत आहे.
विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाने १७व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.५० कोटींची कमाई केली. ५५ कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने आत्तपर्यंत देशात ७६.८५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. 'सॅम बहादूर' सिनेमात विकी कौशलबरोबर सान्या मल्होत्रा, फातिमा शेख, नीरज काबी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.