बॉलिवूड आणि बॉक्स ऑफिससाठी येणारा शुक्रवार महत्त्वाचा आणि खास असणार आहे. १ डिसेंबरला 'सॅम बहादूर' आणि 'ॲनिमल' हे दोन बहुचर्चित बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या शुक्रवारी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'सॅम बहादूर' आणि रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या प्रतिक्षेत गेली कित्येक दिवस प्रेक्षक आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार? हे पाहणं निर्णायक ठरणार आहे.
'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर' या दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 'ॲनिमल'मधील रणबीरचा लूक पाहून प्रेक्षकांची या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली होती. तर 'सॅम बहादूर'च्या ट्रेलरमधील विकीच्या अभिनयाची झलक पाहूनच प्रेक्षक थक्क झाले होते. त्यामुळे या दोन्ही सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 'ॲनिमल' आणि 'सॅम बहादूर'च्या ॲडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. रणबीरच्या 'ॲनिमल' सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमधून कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. तर विकी कौशलचा 'सॅम बहादूर'ही 'ॲनिमल'ला तगडी टक्कर देताना दिसत आहे.
रणबीरच्या 'ॲनिमल' सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत तब्बल २० कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या ७ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. तर विकीच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या ५७ हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून १.८२ कोटींची कमाई केली आहे.
'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशलने भारतीय लष्कर अधिकारी सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात विकीबरोबर सान्या मल्होत्रा, फातिमा शेख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 'ॲनिमल' सिनेमात रणबीरबरोबर अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.