दाक्षिणात्य कलाविश्वातील पॉवरफूल कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य ही जोडी विभक्त होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही नेटकऱ्यांमध्ये या जोडीची सातत्याने चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर समंथाच्या वेडिंग गाऊनची चर्चा रंगलीये. समंथाने तिच्या वेडिंग गाऊनला कात्री लावली असून त्याला एक वेगळा लूक दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा तिच्या लग्नाच्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या लग्नातील साडी सुद्धा नागा चैतन्यला परत केली होती. त्यानंतर आता तिने तिच्या लग्नातील वेडिंग गाऊन सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या आठवणींमध्ये अडकून रहायला नको यासाठी तिने तिच्या वेडिंग गाऊनपासून एक नवा डिझायनर ड्रेस तयार केला आहे.
समंथाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा काळ्या रंगाचा दिसणारा ड्रेस म्हणजे तिचा वेडिंग गाऊन आहे. लग्नातील पांढऱ्या रंगाच्या गाऊनला तिने वेगळी डिझाइन आणि रंग देऊन त्याचा संपूर्ण लूक बदलला आहे. याविषयीची माहिती स्वत: समंथाने दिली आहे.
समंथाचा वेडिंग गाऊन डिझायनर क्रेशा बजाज हिने डिझाइन केला होता. याच गाऊनला नवा लूक सुद्धा तिनेच दिला आहे. क्रेशाने या वेडिंग गाऊनला ब्लॅक कलरच्या कॉरसेटमध्ये बदलून टाकलं आहे. हाच नवा ड्रेस परिधान करुन समंथा एका अवॉर्ड फंक्शनलादेखील उपस्थित राहिली होती.
दरम्यान, समंथाने २०१७ मध्ये नागा चैतन्यसोबत गोव्यात लग्न केलं होतं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २०२१ मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.