झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम सध्या वादात सापडला आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्फ करुन वापरण्यात आला होता. त्यात शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्याऐवजी तेथे भाऊ कदम व कुशल बद्रिके यांचा फोटो दाखवण्यात आला होता. यावरून हा कार्यक्रम वादात सापडला होता. आता याचप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये निलेश साबळे, कुशल बद्रिके व भाऊ कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कलाकारांनी तसेच झी वाहिनीने याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित फोटोवर आपेक्ष घेत छत्रपती संभाजी राजे यांनी एक ट्वीट केले होते.
‘डोक्यात लोकप्रियतेची हवा शिरली की माणूस विक्षिप्त वागतो... ’ असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते. तसेच या प्रकाराबाबत निलेश साबळेने जाहीर माफी मागावी असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर झी वाहिनीच्या सोशल मीडिया हँडलवरुन निलेश साबळे याने व्हिडिओ शेअर करत माफी मागितली होती.
‘स्कीटमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत,’ अशा शब्दांत निलेश साबळे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
.