शाहरुख खानचा लेक आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी NCB अधिकारी समीर वानखेडेंची चांगलीच चर्चा झाली. समीर वानखेडेंवर याप्रकरणात अनेक आरोप लागले. या प्रकरणी समीर यांनी पहिल्यांदाच मोकळेपणाने एका मुलाखतीत भाष्य केलंय. लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडेंनी शाहरुख खान - आर्यन खान प्रकरणावर त्यांचं स्पष्ट मत मांडलंय.
समीर वानखेडे मुलाखतीत म्हणाले, "आयुष्यात काय घडून गेलं त्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही. जर मला आयुष्यात संधी मिळाली तर पुन्हा मी ती गोष्ट करेल." वानखेडेंनी दिलेलं उत्तर शाहरुखला आव्हान आहे असं म्हणता येईल का? यावर वानखेडे म्हणाले, "मी फार छोटा माणूस आहे. मी कोणालाही काही आव्हान करु शकत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेताय ती व्यक्ती मी नाही. मी जास्त सिनेमे बघत नाही. मी त्यांना इतकं ओळखतही नाही."
बायको अभिनेत्री असूनही तुम्हाला शाहरुखच्या लोकप्रियतेबद्दल माहित नाही? यावर समीर म्हणाले, "माझी बायको अभिनेत्री आहे पण मी तिला हिरोईन होण्याआधी ओळखत आहे. क्रांती आणि मी १९९७ ला एकाच कॉलेजमध्ये होतो. आम्ही तेव्हापासून एकमेकांना ओळखत आहे. त्यावेळी मी सुद्धा कोणी ऑफीसर नव्हतो किंवा ती सुद्धा कोणी अभिनेत्री नाही. तुम्ही जर पंतप्रधान मोदींसारख्या खऱ्या नायकांबद्दल विचाराल तर मी उत्तर देईल."