समीर चौघुलेंसाठी पहिला पगार होता खूपच खास; आई-वडिलांसाठी घेतलं होतं 'हे' गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:40 PM2023-05-22T19:40:00+5:302023-05-22T19:40:02+5:30
samir choughule: समीरला पहिला पगार अत्यंत कमी होता. मात्र, तरीदेखील त्याने त्याच्या आई-वडिलांसाठी खास गिफ्ट आणलं होतं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर चौघुले. उत्तम अभिनयशैलीसह लेखन कौशल्य लाभलेला समीर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचंही दिसून येतं. यात त्याच्याविषयी कायम नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न चाहते करत असतात. अलिकडेच समीरने लोकमत फिल्मीसोबत एक छोटासा गेम खेळला. या गेममध्ये त्याने त्याची पहिली कमाई आणि त्यातून आई-वडिलांसाठी घेतलेलं पहिलं गिफ्ट याविषयी भाष्य केलं.
स्व कमाईतून घेतलेली पहिली वस्तू कोणती असा प्रश्न समीरला विचारण्यात आला होता. यावर त्याने आईवडिलांसाठी पहिली भेट आणल्याचं सांगितलं."माझा पहिला पगार महिन्याला 337 रुपये होता. त्यावेळी मी बँकेत नोकरी करायचो. या पहिल्या पगारातून मी आई-वडिलांसाठी भेट घेऊन गेलो होतो. माझ्या आईला आईस्क्रीम खूप आवडतं. त्यामुळे मी घरी आईस्क्रीम घेऊन गेलो होतो", असं समीर चौघुलेनी सांगितलं.
दरम्यान,समीर चौघुले आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर आहे. त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रासोबतच 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या कार्यक्रमात काम केलं आहे.