उत्तम लिखाण, तितकच विनोदकौशल्य आणि वाखाणण्याजोगा अभिनय यामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे समीर चौघुले. महाराष्ट्राी हास्यजत्रा या कार्यक्रमातून त्यांनी आजवर अनेकांचं मनोरंजन केलं. उभ्या महाराष्ट्राला हसवलं. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा आईचं निधन झालेलं असताना डोळ्यातलं पाणी लपवून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. अलिकडेच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं.
जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त काळ समीर चौगुले कलाविश्वात सक्रीय आहेत. या २५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक चढउतार पाहिले. मात्र, आईचं निधन आणि नाटकाचा ठरलेला प्रयोग यांमध्ये कशी घालमेल झाली होती हे त्यांनी सांगितलं.
"आयुष्यात कठीण टप्पा म्हणजे काय? माझी आई गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा प्रयोग होता. 'यदा कदाचित' हे नाटक तेव्हा हाऊसफुल चालत होतं. त्याचे तीन हजार प्रयोग मी केले होते. तेव्हाही तिकीट बुकिंग फूल झालेलं. पण, अचानक आदल्या दिवशी माझ्या आईचं हार्ट अटॅकने निधन झालं. पण, मी इतका नशीबवान आहे की, माझे बाबा मला म्हणाले, तू जा. तेव्हा खूप कठीण असतं ना की, तुम्हाला माहितीये घरात काहीतरी झालंय. पण तुम्हाला लोकांना हसवायचंय. ते लोक तिकीट काढून आलेत", असं समीर चौगुले म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "तेच जर गंभीर काही काम असतं तर मला सोपं गेलं असतं. तर, त्यावेळेला मला क्षणभर असं वाटलं की मी हे सगळं का करतोय? मी विंगेत उभा राहून विचार करत होतो. आपण इतके निर्दयी झालो आहोत का? मी हे का करतोय? हे सगळं करायचंय का? कारण, त्यावेळेला माझी नोकरी सुरु होती. विचार आला की मी नोकरी का करत नाहीये? मी एवढा निर्दयी झालो का की आई जाऊनही मला लोकांना हसवायचं जास्त पडलंय. पण शेवटी बाबांनी मला खूप आधार दिला. ते म्हणाले, जा तू. मिसेसने सांगितलं की तू अॅक्टर आहेस. तू विदूषक आहेस. त्याचा जन्मच लोकांना हसवण्यासाठी झालेला असतो. तुम्ही जेव्हा कलाकार होता तेव्हा शो मस्ट गो ऑन म्हणावं लागतं. मग विचार आला की नाही आई असती तरी तिनेही मला जबरदस्ती पाठवलं असतं."