कलाकार : अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा, साक्षी तन्वीर, मनोज जोशी, मानव विज, ललित तिवारी, अजय चक्रवर्ती, गोविंद पांडेयलेखक-दिग्दर्शक : डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदीनिर्माते : आदित्य चोप्रा (यश राज फिल्म्स)कालावधी : २ तास १५ मिनिटेस्टार - साडे तीन स्टारचित्रपट परीक्षण : संजय घावरे
'यतो धर्मस्ततो जयः' म्हणजेच जिथे धर्म आहे तिथे जय आहे. यानुसार धर्मरक्षणासाठी प्राणांची पर्वा न करणाऱ्या महापराक्रमी सम्राट पृथ्वीराज चौहान यांची शौर्यगाथा या चित्रपटात आहे. आजवर केवळ एखाद्या गोष्टीपुरते मर्यादित असणारे पृथ्वीराज या निमित्तानं आजच्या पिढीला समजतील. पुस्तकांमध्ये कैद असलेले पृथ्वीराज चित्रपटाद्वारे सर्वदूर पोहोचवण्याचं काम लेखक-दिग्दर्शक डॅा. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. यात काही त्रुटी राहिल्या असून, मनोरंजक मूल्यांचा अतिवापर झाल्याचं जाणवत असलं तरी स्त्री समानतेचे प्रणेते असणाऱ्या भारताच्या सम्राटाची कथा रसिकांसमोर आल्याचं समाधान आहे.
चित्रपटाची कथा अफगाणिस्तानातील गजनीमधील मोहम्मद घोरीच्या जुलूमी दरबारापासून सुरू होते. घोरीने डोळे फोडल्यावर सम्राट पृथ्वीराज केवळ आवाजाच्या दिशेनं वार करत एका मागोमाग तीन सिंहांचा खात्मा करतात आणि तिथूनच खरी कथा सुरू होते. मोहम्मद घोरीनं ठेवलेल्या चित्रलेखाला पळवून त्याचा भाऊ मीर हुसेन पृथ्वीराजांकडे अभय मागतो. चित्रलेखाही मीरवर प्रेम करत असल्यानं प्रेम आणि धर्माला मानणारे पृथ्वीराज त्याला स्थान देतात. हा राग मनात ठेवून घोरी पृथ्वीराजांवर हल्ला करतो आणि पराभूत होतो. पृथ्वीराज त्यालाही माफ करून सोडतात. दुसरीकडे कन्नौजपती जयचंद्र यांची कन्या न बघताच पृथ्वीराजांच्या प्रेमात पडलेली असते. पृथ्वीराजांचे दिल्लीतील अर्धे राज्य जयचंद्रला हवे असते, पण ते मिळत नाही. त्यानंतर तो घोरीशी हातमिळवणी करून कशाप्रकारे कट-कारस्थान करतो ते चित्रपटात पहायला मिळतं.
लेखन दिग्दर्शन : लेखन आणि रिसर्च यांसाठी द्विवेदी यांनी खूप काळ घेतला असला तरी पटकथेची बांधणी आणखी घट्ट हवी होती. बृज भाषेतील पृथ्वीराज रासो या काव्यावर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं असल्यानं पृथ्वीराज-संयोगितांच्या प्रेमकथेपासून त्यांनी घोरीचा वध करण्यापर्यंतचे सर्व संदर्भ त्यातूनच घेण्यात आले आहेत.रोमांचक प्रसंगांची कमतरता जाणवते. बोलीभाषेतील लहेजा कमी पडतो. शत्रूलाही अभय देण्याइतकं मोठं मन असणाऱ्या एका पराक्रमाची राजाची गाथा काही ठिकाणी भावूक करते. जयचंद्रचं राजसूय यज्ञाचं निमंत्रण देणं, ते न स्वीकारल्यानं पृथ्वीराजांची सुवर्णमूर्ती बनवून जयचंद्रनं द्वारपालाच्या जागी ठेवणं, संयोगितानं स्वयंवरात त्या मूर्तीलाच वरमाला घालून पृथ्वीराजांची निवड करणं, पृथ्वीराजांचं संयोगिताला घेऊन जाणं, तिला आपल्या बरोबरीनं सन्मानानं गादीवर बसवणं, एकही युद्ध न हरणाऱ्या पृथ्वीराजांना सासऱ्यांनी रचलेल्या कुभांडामुळं घोरीसमोर बंदी बनावं लागणं आणि अखेर दृष्टीहिन असूनही एका बाणात घोरीला यमसदनी धाडणं याद्वारे पृथ्वीराजांनी गाजवलेला पराक्रम, त्यांची प्रेमकथा आणि स्त्री समानतेविषयीच्या विचारांचं दर्शन घडवण्यात आलं आहे. संयोगितानं मूर्तीच्या गळ्यात वरमाला घालताच पृथ्वीराजांचं हजर होणं आणि तिला घेऊन जाण्यासारख्या काही दृश्यांमध्ये मनोरंजक मूल्यांचा अतिवापर झाल्यासारखा वाटतो. लग्नानंतरचं 'मखमली प्यार तेरा मखमली...' गाणं अनावश्यक होतं. कॅमेरावर्क, कॅास्च्युम, कला दिग्दर्शन या बाजू चांगल्या आहेत.
कलाकारांचा अभिनय : चालत्या घोड्यावरून उतरण्यापासून तलवारबाजीपर्यंत प्रत्येक बाबतीत अक्षय कुमारनं साकारलेले सम्राट पृथ्वीराज लक्षात राहतात. संयोगिताच्या भूमिकेत मानुषी छिल्लर सुंदर दिसत असली तरी अभिनयात अद्याप कच्ची असल्याचं जाणवतं. काही ठिकाणी भावुक करणारी चंद बरदाई ही एका पंडीताची सकारात्मक व्यक्तिरेखा सोनू सदूनं अत्यंत मेहनतीनं साकारली आहे. पराक्रमी, निष्ठावान आणि आज्ञाधारी सेवकाच्या भूमिकेत संजय दत्तनं चांगलं काम केलं आहे. मोहम्मद घोरीच्या भूमिकेत मानव विजनं आश्चर्यकारक यश मिळवलं आहे. बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर दिसलेल्या आशुतोष राणा आणि साक्षी तन्वीर यांनी आपापल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. मुख्य आणि सहाय्यक भूमिकांमधील कलाकारांना इतर कलाकारांचीही चांगली साथ लाभली आहे.
सकारात्मक बाजू : अजेय असणाऱ्या महापराक्रमी सम्राटानं रचलेला इतिहास, त्यांची प्रेमकथा, धर्मानुसार आचरण, स्त्रीयांविषयीची मते जाणून घेता येतात.
नकारात्मक बाजू : बोलीभाषेपासून युद्धप्रसंगांपर्यंत बऱ्याच ठिकाणी त्रुटी आढळतात. काही युद्धप्रसंग आणखी विस्तृतपणे सादर करण्याची गरज होती.
थोडक्यात : काही त्रुटी राहिल्या असल्या तरी भारतीय राजे किती शूर होते हे जाणून घेण्यासाठी केवळ लहान मुलांनी किंवा तरुणाईनंच नव्हे तर सर्वांनी हा चित्रपट एकदा का होईना पहायला हवा.