लॉकडाऊनमुळे पित्याच्या अंत्यदर्शनालाही मुकली ही अभिनेत्री, विदेशात पडली अडकून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:03 AM2020-04-03T10:03:46+5:302020-04-03T10:04:52+5:30
जनता कर्फ्यूच्या दिवशी झाले वडिलांचे निधन
‘कुछ कुछ होता है’मधील छोटी अंजली अर्थात सना सईद हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. होय, सनाच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. पण सर्वांत दु:खद म्हणजे, सना वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ शकली नाही. जनता कर्फ्यूच्या दिवशीच सनाचे वडिल अब्दुल अहद सईद यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. यादरम्यान सना लॉस एंजिल्समध्ये होती. लॉकडाऊनमुळे ती तिथे अडकून पडली आणि पित्याचे अखेरचे दर्शनही तिला घेता आले नाही.
सनाचे वडील अब्दुल अहद सईद हे एक ऊर्दू कवी होते. दीर्घकाळापासून ते आजारी होते. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सनाने याबद्दल सांगितले.
तिने सांगितले की, माझे पापा शुगर पेशंट होते. यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांनी हळूहळू काम करणे बंद केले होते़.लॉस एंजिल्समध्ये सकाळचे 7 वाजले होते. त्यावेळी मला त्यांच्या निधनाची बातमी मिळाली. मला माझ्या आईला, बहीणीला जवळ घ्यावेसे वाटले. पण मी त्यांच्यापासून खूप लांब होते. ज्या स्थितीत माझ्या वडिलांचे निधन झाले, ते वेदनादायी होते. मात्र मी जाणते, ते स्वत:ही खूप वेदनेत होते. आता ते जिथे कुठे असतील तिथे चांगले असतील.’
तिने पुढे सांगितले, जनता कर्फ्यूच्या दिवशी वडिलांचे निधन झाले तेव्हा, त्याच दिवशी त्यांचा दफनविधी झाला. या सगळ्यासाठी केवळ तीन तास होते. दफनविधीसाठी जात असताना पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांनी डेथ सर्टिफिकेट दाखवले तेव्हा कुठे त्यांनी त्यांना जाऊ दिले. मी तिथे नव्हते. पण माझी बहीण मला सगळी माहिती देत होती.
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटानंतर सना सईद २००० साली बादल व हर दिल जो प्यार करेगा चित्रपटात झळकली होती. चित्रपटांव्यतिरिक्त सना सईदने टेलिव्हिजनवरील मालिकेत काम केले आहे. बाबुल का आंगन छूटे ना, लो हो गई पूजा इस घर की, कॉमेडी सर्कस व लाल इश्क या मालिकेत तिने काम केले आहे. झलक दिखला जा ६,झलक दिखला जा ७, नच बलिए ७ आणि झलक दिखना जा ९ या रिएलिटी शोमध्येदेखील ती दिसली होती. २०१२ साली प्रदर्शित झालेला करण जोहरचा चित्रपट स्टुडंट आॅफ द ईयरमध्ये सना झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. या चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट मुख्य भूमिकेत होते.