कसदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. फुले दांपत्यावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट या वर्षअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलीकडेच राजश्री देशपांडेची प्रमुख भूमिका असलेली 'सेक्रेड गेम्स' आणि संदीप कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेली 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेब सीरिज गाजल्या आहेत. या दोघांच्याही अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही कसलेले कलाकार एकत्र आले आहेत. 'सत्यशोधक' या चित्रपटाची निर्मिती समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटनं केली आहे. नीलेश जळमकर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत.
'सत्यशोधक' चित्रपटाविषयी संदीप कुलकर्णी म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसंच त्यांचं नातंही काळाच्या पुढेच होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं यावर हा चित्रपट आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचं ५० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाअखेरीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.