संदीप कुलकर्णी यांनी आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते. 'श्वास', 'डोंबिवली फास्ट', 'गैर', 'लेडीस स्पेशल', 'सानेगुरुजी', 'दुनियादारी' यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि 'ट्रॅफिक सिग्नल', 'हजारो ख्वाईशे ऐसी', 'इस रात की सुबह नहीं' अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी "डोंबिवली रिटर्न" या चित्रपटाचा नायक अनंत वेलणकर अर्थात संदीप कुलकर्णी यांची डोबिंवली रेल्वे स्टेशनवर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये विशेष उपस्थिती लाभली होती. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई निर्माते महेंद्र अटोले डोंबिवली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, सहायक स्टेशन मास्तर, रेल्वे प्रवाशी संघटना, जनरल रेल्वे पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, उपस्थित होते. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकलने दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिकही या वेळी उपस्थित होते.
नियतीने जशा गोष्टी जुळून येतात तसा योग खरंतर आज जुळून आलाय. माझ्या माध्यम आणि सिनेमाच्या निमित्ताने डोंबिवलीशी माझा जवळचा संबंध आहे.माझे मित्र नातेवाईक ही डोंबिवलीमध्ये राहतात. असं कधी वाटलं नव्हतं कि माझ्या कलाकृतीच्या निमित्ताने मी डोंबिवलीचा एवढा मोठा भाग होईन.डोंबिवली हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.आजचा हा दिवस अभिमान , कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. प्रवाशांना विविध सेवा देताना आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या रेल्वेच्या विविध विभागातील लोकांसोबत हा दिवस साजरा करावासा वाटला यासाठी मी इकडे आलो.अशा भावना यावेळी संदीप कुलकर्णीने व्यक्त केल्या. "डोंबिवली रिटर्न" ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. "डोंबिवली रिटर्न" हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील सिनेमा आहे. डोंबिवली रिटर्न या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी सर्वसामान्य नोकरदाराची भूमिका केली आहे. हा अनंत वेलणकर लोकलमधून धक्के खात रोज प्रवास करत असतो. त्याच्या आयुष्यातल्या एका घटनेमुळे काय घडतं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. करंबोला क्रिएशन्सची निर्मिती असलेला, महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.