घडलंय बिघडलंय, फू बाई फू यांसारख्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप पाठक ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारत आहे. या मालिकेविषयी सीएनएक्ससोबत त्याने गप्पा मारल्या.प्रेक्षकांना रडवणे सोपे असते. पण प्रेक्षकांना हसवणे हे खूपच कठीण आहे. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवण्याचे काम संदीप पाठक मालिका, नाटक आणि चित्रपटाद्वारे करत आहे. इथेच टाका तंबू या मालिकेत आता संदीप एका पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत अनेकजणांनी चित्रपट, मालिकांमध्ये पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आपली भूमिका इतरांपेक्षा वेगळी असावी यावर संदीप मेहनत घेत आहे. संदीप सांगतो, ‘या मालिकेत मी विनोदी भूमिका साकारत आहे. पोलिस इन्सपेक्टरची भूमिका आजवर आपण अनेक चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेली आहे. पण मी या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. कोणत्याही अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेसोबत माझ्या भूमिकेची तुलना केली जाऊ नये असे मला वाटते. या मालिकेत शशांक केतकर, मधुरा देशपांडे यांसोबतच काही नवीन कलाकारदेखील आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मला खूप मजा येत आहे. या मालिकेत अलिबागमधील अनेक स्थानिक कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करताना त्यांची ही पहिली मालिका आहे असे थोडेही वाटत नाही. मालिकेच्या सेटवर तर आम्ही एखादे कुटुंब असल्यासारखेच वागतो. चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या ब्रेकमध्ये आम्ही पत्ते, कॅरम खेळतो. तसेच जेवतानादेखील प्रत्येकजण वेगवेगळ्या खोलीत जाऊन न खाता जमिनीवर बसून एकत्र जेवतो.’‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत एका हॉटेलमधली कथा पाहायला मिळणार आहे. या हॉटेलमध्ये काम करणारे सगळेच कर्मचारी हे थोडेसे विचित्र आहेत. आपल्या खऱ्या आयुष्यातही आपल्याला अशाप्रकारचे अनुभव येतात असे संदीप सांगतो. संदीपने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला. तो सांगतो, "नाटकाच्या दौऱ्यावर असताना प्रयोग संपल्यावर रात्री हॉटेल रूमवर पोहोचायला खूप वेळ होतो. त्यावेळी रात्री त्या कर्मचाऱ्यांची आम्हाला पाहून जी प्रतिक्रिया असते, ती पाहूनच आम्हाला हसायला येते. मी एका नाटकाच्या दौऱ्याला गेलो होतो. त्यावेळी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्याने तुम्हाला पाहिजे ते मांसाहारी जेवण येथे खायला मिळेल असे आम्हाला सांगितले. त्यावर आम्ही चिकन करायला सांगितले तर आमच्याकडे चिकन नाहीये असे त्याने सांगितले. मटण, मासे, अंडी हे पदार्थ विचारल्यावरदेखील आमच्याकडे हे नाही असेच उत्तर त्याने दिले. हे उत्तर ऐकल्यावर आमच्याकडे सगळे मांसाहारी पदार्थ आहेत याचा अर्थ काय होतो हाच मला प्रश्न पडला. त्यावर आता हे मांसाहारी पदार्थ तुमच्याकडे नाही तर उंट आहे का असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर आम्ही सगळेच प्रचंड हसलो होतो. असे अनुभव प्रत्येकालाच येत असतात. असेच अनुभव प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.’ संदीप आणि शशांक हे दोन्ही चांगले अभिनेते असल्याने ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे यात काही शंकाच नाही.
- prajakta.chitnis@lokmat.com