'कोण होणार करोडपती' (kon honaar crorepati) या ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे, त्यांच्या संघर्ष कहाण्यांमुळे कायमच इतरांना प्रेरणा मिळते. तर दर शनिवारी रंगणाऱ्या विशेष भागांमुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो. या शनिवारच्या कर्मवीर विशेष भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिमत्त्व असणारे संदीप वासलेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पुणे येथील अनुताई वाघ यांनी स्थापन केलेल्या 'ग्राममंगल' या संस्थेसाठी संदीप वासलेकर हे हा खेळ खेळणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत कर्मवीर सुधा मूर्ती, अधिक कदम या भागांमध्ये सहभागी झाले होते. या आठवड्यातील कर्मवीर भागात संदीप वासलेकर उपस्थित राहणार आहेत. देशादेशांमधले तंटे सोडवणं, शांततेच्या मार्गाने त्यांच्यात समेट घडवून आणणं, अधिक चांगली राज्यपद्धती चालावी यासाठी विविध संशोधन करणं, सल्लासमलत करणं, भविष्यात अधिक प्रगल्भतेकडे जाणारी शासनपद्धती निर्माण करण्यास मदत व सल्ला देणं असं महान कार्य करणारे संदीप वासलेकर यांच्या विचारांनी हा भाग निश्चितच ज्ञान देणारा ठरणार आहे.
'जिथे नेता होतो मोठा तो देश छोटा आणि जिथे नेता-नागरिक समान तो देश होतो महान' असे मत संदीप वासलेकर यांनी या कर्मवीर विशेष भागात मांडले आहे.