Join us

'संगीत मानापमान' सिनेमातील १८ गायकांनी गायलेली १४ गाणी प्रेक्षकांच्या भेटीला, कुठे ऐकायला मिळतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:27 IST

'संगीत मानापमान' सिनेमाचा म्यूझिक अल्बम रिलीज झाला असून ही दर्जेदार गाणी कुठे ऐकायला मिळतील जाणून घ्या

'संगीत मानापमान' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. दिवाळीमध्ये सिनेमाचा टीझर रिलीज झाला तेव्हापासूनच सिनेमा पाहण्यासाठी लोकांना आतुरता आहे. 'संगीत मानापमान' सिनेमा काहीच महिन्यांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा संगीत मानापमान या गाजलेल्या नाटकावर आधारीत आहे. बालगंधर्व, केशवराव भोसलेने अशा रंगभूमीवरील दिग्गजांनी हे नाटक गाजवलेलं. याच नाटकावर आधारीत 'संगीत मानापमान' सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज आहे. नाटकातील लोकप्रिय गाणी सिनेमात कशी ऐकायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर 'संगीत मानापमान'च्या गाण्यांचा अल्बम रिलीज झालाय.

१८ गायकांनी गायलेली १४ गाणी

'संगीत मानापमान'च्या पूर्ण म्यूझिक अल्बमध्य् तब्बल १८ दिग्गज गायकांनी गायलेली १४ गाणी ऐकायला मिळणार आहेत. यामध्ये नाही मी बोलत नाथा, मला मदन भासे हा, शूरा मी वंदिले, रवी मी ही नाटकातील गाजलेली गाणी पुन्हा नव्या ढंगात ऐकायला मिळणार आहेत. राहुल देशपांडे, शंकर महादेवन,  महेश काळे, अवधूत गुप्ते, आर्या आंबेकर, जसराज जोशी, हृषिकेश जोशी यांसारख्या लोकप्रिय गायकांनी ही गाणी गायली आहेत. ही सर्व १४ गाणी तुम्हाला युट्यूब आणि इतर म्यूझिक प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळतील.

'संगीत मानापमान' कधी रिलीज होणार?

'संगीत मानापमान' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना  कुलकर्णी, निवेदिता सराफ सारख्या आणखी दिग्गज कलाकारांना आपण सिनेमात पाहू शकतो. येत्या १० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  'कट्यार काळजात घुसली' या संगीतमय सिनेमानंतर सुबोध भावे दिग्दर्शित 'संगीत मानापमान' सिनेमा काय कमाल दाखवणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळून येईलच.

टॅग्स :सुबोध भावे सुमीत राघवनवैदेही परशुरामी