बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्तच्या बायोपिकची - 'संजू' या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे. संजूबाबाचं वादग्रस्त आणि अनेक चढ-उताारांनी भरलेलं आयुष्य या चित्रपटातून समोर आलंय आणि त्यावरून उलटसुलट चर्चाही रंगलीय. या सिनेमातील अनेक सीन प्रदर्शनाच्या आधीपासूनच गाजले होते - गाजताहेत. पण, संजय दत्तच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग या सिनेमात टाळण्यात आल्याचं काही जाणकारांनी निदर्शनास आणून दिलंय. हा प्रसंग म्हणजे, संजय दत्तनं मातोश्रीवर जाऊन घेतलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेहेरे यांचा हा व्हिडिओ आहे.
12 मार्च 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर, संजय दत्तच्या घरी AK-47 सापडली होती. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला 1995 साली तुरुंगात जावं लागलं होतं. दत्त कुटुंबीयांसाठी हा मोठाच धक्का होता. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. संजयवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं त्यांची राजकीय कारकीर्दच पणाला लागली होती. स्वाभाविकच त्यांनी वेगानं हालचाली केल्या. दिल्लीदरबारी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली, दाद मागितली. पण, या भेटीचा काहीच उपयोग झाला नाही. स्वाभाविकच, सुनील दत्त संकटात सापडले होते.
मुलाला वाचवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करणाऱ्या सुनील दत्त यांना अभिनेते राजेंद्र कुमार यांनी एक पर्याय सुचवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची सूचना त्यांनी केली. सुरुवातीला, सुनील दत्त यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. पण, दोन दिवसांनी ते तयार झाले होते आणि मुलाच्या सुटकेसाठी त्यांनी थेट 'मातोश्री'ला साद घातली होती.
संजय दत्त आणि बाळासाहेबांच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. यात व्हिडिओत आपल्याला बाळासाहेब, शत्रुघ्न सिन्हा, संजय दत्त, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार दिसताहेत. बाळासाहेब आणि संजय दत्त यांच्यातील संवादही व्हिडीओत पाहायला मिळतोय. संजय दत्तच्या कपाळावरील भगव्या रंगाचा टिळाही लक्षवेधी ठरतोय. संजय दत्त तुरुंगात गेला, त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं आणि अर्थातच बाळासाहेब 'रिमोट कंट्रोल' होते.