साऊथचा बहुप्रतिक्षीत ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) हा सिनेमा आज रिलीज झालाये आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार यश (Yash) लीड रोलमध्ये आहे तर संजय दत्त (Sanjay Dutt) अधीरा या खलनायकाची भूमिका साकारतोय. चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सगळेच हा सिनेमा पाहण्यास उत्सुक आहेत. पण संजय दत्तची लेक इकरा हिने मात्र पापाचा हा सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. होय, खुद्द संजयने यामागचं कारण सांगितलं.
एका मुलाखतीत संजूबाबा ‘केजीएफ 2’बद्दल बोलला. माझी लेक इकरा हा सिनेमा बघणार नाही, असं त्याने सांगितलं. यामागचं कारण विचारल्यावर तो म्हणाला, ‘ज्या सिनेमात माझं कॅरेक्टर मरतं, ते सिनेमे इकरा पाहत नाही. दरवेळी मी सिनेमा साईन केला की, तुम्ही या चित्रपटात मरताना दिसणार आहात का? हा इकराचा पहिला प्रश्न असतो. सिनेमातील माझं पात्र मरणार असेल तर ती तो सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेते. त्यामुळे इकरा हा चित्रपट पाहणार नाही. माझा मुलगा शहरान मात्र हा चित्रपट पाहायला कमालीचा उत्सुक आहे. तो त्याच्या मित्रांसोबत सतत याच चित्रपटाबद्दल बोलतोय.’
‘केजीएफ 2’चं शूटींग सुरू असतानाचझालं होतं कॅन्सरचं निदान 2020 मध्ये ‘केजीएफ 2’चं शूटींग सुरू असतानाच संजय दत्तला कॅन्सरचं निदान झालं होतं. यानंतर कॅन्सरच्या उपचारासाठी तो विदेशात गेला होता. या आजारातून बरा झाल्यावर संजयने सर्वात आधी‘केजीएफ 2’ शूटिंग सुरू केलं होतं.याबद्दलही संजय बोलला. ‘ होय, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होतं. माझ्यावर उपचार सुरू होते, केमोचे सत्र सुरू होतं आणि जेव्हा मी क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केलं तेव्हा देखील ते सुरूच होतं. त्यातून सुटका नव्हती. मात्र तुमच्या जीवनात रॉक-सॉलिड सपोर्ट सिस्टीम असेल तेव्हा ते करणं सोपं होतं.माझ्या कुटुंबाची ताकद माझ्यासोबत होती. देव दयाळू आहे, आज मी कर्करोगमुक्त आहे आणि नॉर्मल आयुष्य जगतो आहे,’असं तो म्हणाला.चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयची तब्येत लक्षात घेता चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि मेकर्सनी संजयला बॉडी डबलची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. पण संजयने बॉडी डबलशिवाय संपूर्ण सीन स्वत: शूट केला होता.