बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' हा सिनेमा यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. ‘पठाण’ची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाहीये. जगभर या सिनेमानं धुमाकूळ घातला. भारतातच नव्हे तर जगभर या सिनेमानं छप्परफाड कमाई केली. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती शाहरूखच्या ‘जवान’ या चित्रपटाची. किंगखानचे चाहते ‘जवान’ची (Jawan) आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘जवान’मध्ये नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही भूमिका आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक फक्कड बातमी कानावर येतेय. होय, नुकतीच या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, या चित्रपटात संजय दत्तचा (Sanjay Dutt ) कॅमिओ पाहायला मिळणार आहे.
‘पीपिंग मून’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटातील छोट्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अभिनेत्याची निवड करणं दिग्दर्शक एटलीसाठी एक कठीण टास्क होता. त्याला या भूमिकेसाठी एका मोठ्या सुपरस्टारची गरज होती. एटलीला या भूमिकेसाठी अल्लू अर्जुन हवा होता. पण अल्लूने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ‘पुष्पा २’मध्ये बिझी असल्यानं त्याने नकार दिल्याचं कळतंय. अल्लूच्या नकारानंतर या भूमिकेसाठी संजय दत्तला विचारणा करण्यात आली आणि त्याने ही भूमिका लगेच स्वीकारली. अर्थात फक्त आणि फक्त शाहरूखसाठी तो या सिनेमात काम करायला राजी झाला म्हणे. लवकरच संजय दत्त मुंबईत चित्रपटाचा सीक्वेन्स शूट करणार असल्याचीही माहिती आहे.
याआधी ओम शांती ओमच्या टायटल सॉन्गमध्ये शाहरूख व संजय दत्त एकत्र दिसले होते. रावन मध्येही संजय दत्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. संजय दत्तशिवाय दीपिका पादुकोण हिचाही कॅमिओ जवानमध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणि, सान्या मल्होत्रा अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. २ जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.