बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे संजय दत्त. 'अग्निपथ', 'खलनायक', 'धमाल', 'हसीना मान जाएगी', 'केजीएफ २', 'सडक', 'मुन्नाभाई एमबीबीएस' अशा विविध सिनेमांमधून संजूबाबाने अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडली. संजय दत्तचे सिनेमे हे इमोशन्स आणि अॅक्शनची पर्वणी असतात. संजय दत्त सध्या त्याच्या सिनेमांमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतीच संजय दत्तने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्रींची भेट घेतली.
संजय दत्तने धीरेंद्र शास्त्रींची घेतली भेट
संजूबाबा १५ जूनला बागेश्वर धाममध्ये गेला होता. तिथे जाऊन त्याने बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. इतकंच नव्हे तर परिक्रमा पूर्ण करत तो बालाजींच्या चरणी नतमस्तक झाला. संजय दत्त येताच बागेश्वर धाम परिवाराने त्याचं जंगी स्वागत केलं. याशिवाय संजूबाबाने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्रींची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
धीरेंद्र शास्त्रींना भेटल्यावर संजूबाबाची प्रतिक्रिया
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्रींना भेटल्यावर संजय दत्तने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. संजूबाबा म्हणाला, "मी इथे पुन्हा पुन्हा येईन. ही जागा कमाल आहे आणि या ठिकाणी बालाजी महाराजांची कृपादृष्टी आहे." पुढे धीरेंद्र शास्त्रींचा आशीर्वाद घेतल्यानंतर संजय दत्त म्हणाला, "मला असं वाटलं की मी त्यांना वर्षानुवर्षापासून ओळखत आहे. हा माझ्या आयुुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे."