शाहरूख खानच्या ‘झिरो’सोबत रिलीज झालेल्या अभिनेता यशच्या ‘केजीएफ- चार्प्टर 1’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषेत हा चित्रपट रिलीज झाला. दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत होता. डिसेंबरमध्ये रिलीज झालेला ‘केजीएफ’ हा या चित्रपटाचा पहिला भाग होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच अर्थात चार्प्टर 2 प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ताज्या बातमीनुसार, येत्या उन्हाळ्यात ‘केजीएफ 2’चे शूटींग सुरु होत आहे. विशेष म्हणजे, या दुस-या भागात एका बॉलिवूड स्टारची वर्णी लागणार, अशी खबर आहे. हा स्टार कोण तर बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात संजय दत्त.
‘केजीएफ2’मध्ये संजय एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल, असे कळतेय. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘केजीएफ2’मध्ये संजयची वर्णी लागलीच तर बाबासाठी ही मोठी संधी ठरणार आहे. २०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले होते. पण संजयचा हा कमबॅक चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटाला अगदी १० कोटीपर्यंतही मजल मारता आली नाही. यानंतर संजयचा ‘साहब, बीवी और गँगस्टर3 ’ रिलीज झाला. या चित्रपटाकडून संजयला प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही सुपरडुपर फ्लॉप झाला. या दोन चित्रपटाच्या अपयशानंतर संजूबाबाला एका सुपरहिटची गरज आहे. ‘केजीएफ2’मध्ये बाबाची वर्णी लागली तर त्याची ही गरज पूर्ण होणार, इतके नक्की.
‘केजीएफ’ने वर्ल्डवाईड १५० कोटींचा बिझनेस केला होता. ‘झिरो’ला मात देत, ‘केजीएफ’ने बॉक्सआॅफिसवर कब्जा केला होता.‘केजीएफ’चे हिंदी व्हर्जन फरहान अख्तरने प्रोड्यूस केले होते. या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी तरूणाची कथा दाखवली गेली आहे. मुंबईच्या गल्लीबोळात लोकांचे जोडे पॉलिश करता करता हा तरूण गुन्हेगारीच्या दलदलीत येऊन पोहोचतो. यानंतर कोल्लार येथे पोहोचल्यावर त्याचे आयुष्य अचानक वेगळे वळण घेते.