सोहम शाहसोबत पहिले शेड्युल : कारागृहातून सुटका झाल्यावर संजय दत्त पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे. दिग्दर्शक सोहम शाह यांच्या ‘शेर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे शेड्युल त्याने आखले आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय व हुमैमा मलिक यांच्या भूमिका आहेत. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या संजय दत्तचे बॉलीवूडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. आता तो त्याच्या पुढील करिअरची सेकंड इनिंग कोणासोबत सुरू करेल यावरून जोरदार चर्चा रंगत आहे. राजकुमार हिरानींच्या दिग्दर्शनात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनविण्याची तयारी सुरू असून, रणबीर कपूरसोबत येत्या एप्रिल महिन्यात या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त सूत्रधाराच्या भूमिकेत दिसण्याचे संकेत मिळत आहेत. याव्यतिरिक्त करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत संजय दत्तसोबत चित्रपट बनविण्याची योजना आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. हा चित्रपट अॅक्शनपट असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय करण जोहर संजूबाबाबरोबर ‘शुद्धी’ या बहुचर्चित चित्रपटाचीदेखील निर्मिती करण्याची योजना आखत आहे. तसेच मुन्नाभाई सिरीजचा तिसरा चित्रपट लवकरच येणार असल्याचे संकेत विदू विनोद चोपडा यांनी यापूर्वीच दिले आहेत. या वर्षीच या चित्रपटाची शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. संजूबाबाचा जवळचा मित्र बंटी वालिया याच्यासोबतही तो ‘जट पंजाबी’ हा चित्रपट करू शकतो. संजय गुप्तादेखील संजूबाबासोबत चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहे.
- anuj.alankar@lokmat.com