संजय दत्त परत आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून तो ज्या स्वातंत्र्याची प्रतीक्षा करीत होता ते त्याला मिळाले आहे. प्रत्येक वेळी त्याला कारागृहात जाताना वस्तुस्थितीचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा त्याच्या पॅरोलवरही वाद झाले. हा भूतकाळच त्याच्या भविष्याशी जोडला जाईल. ही बाब ऐकण्यास व विचार करण्यास विचित्र वाटते; पण ते नाकारता येत नाही. आता संजय दत्त अन्य लोकांप्रमाणे स्वतंत्र आहे. त्याला कोठेही जाण्या-येण्याची सूट आहे; पण त्याने कारावास भोगलेला असल्याने सामान्य नागरिकांसाठी तो थोडा वेगळा होऊ शकतो. ४२ महिने कारावासात राहिल्यानंतर यापुढे त्याची वागणूक, अॅक्शन आणि विशेषकरून स्टार म्हणून त्याची वर्तणूक यावर लोकांची कडक नजर असेल. त्यामुळेच संजयला वर्तणुकीबाबत सतत सावध राहावे लागेल. एखादी किरकोळ चूक केली, तरीही माध्यमे आणि त्यातही वृत्तवाहिन्या संबंधित बाब ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून प्रसारित करतील, हे ध्यानात घ्यावे लागेल. त्याने केलेल्या चुकीबद्दल वृत्तवाहिन्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. कारण संजय दत्त त्यांची टीआरपी वाढविणारा एक व्यक्ती असेल. आता भूतकाळाशी काहीही संबंध नसला तरीही या वृत्तवाहिन्या त्या काळातील घटनांशी संजयचा संबंध जोडतील.भूतकाळापासून धडा घेऊन भविष्याचा विचार करणाऱ्यालाच माणूस म्हटले जाते. संजयला हेच करावे लागणार आहे. भूतकाळाला विसरून नव्हे तर नेहमी लक्षात ठेवून वागावे लागणार आहे. याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नाही. बॉलीवूडमधील बॅडबॉय ते खलनायक म्हणून त्याला मिळालेले ‘पुरस्कार’ मागे पडले आहेत. त्याची एखादी चूकही या बाबींना उजाळा देऊ शकते. हे सर्व ध्यानात घेऊनच संजयचे स्वागत करावे लागेल.
संजयला काळजीपूर्वक राहावे लागेल
By admin | Published: February 29, 2016 1:36 AM