सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक आणि मग अभिनेता असा प्रवास करणारे संजय जाधव आता एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहेत. मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता संजय जाधव छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. झी मराठीवरील एका प्रसिद्ध मालिकेत ते लवकरच प्रेक्षकांना एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
काय घडलं त्या रात्री या मालिकेला आता एक वळण मिळणार आहे. अॅड.विश्वजीत चंद्रा आणि एसीपी रेवती बोरकर आता मालिकेत समोरासमोर येणार आहेत आणि विशेष म्हणजे विश्वजीत हा दुसरा कोणी नसून रेवतीचा नवरा आहे. विश्वजीत हा अतिशय हुशार आणि अतिशय श्रीमंत वकील आहे. आता संजनाच्या मदतीने सिद्धांत छायाचे वडील लोकांपुढे आर्थिक मदतीची याचना करणार असून त्यातून पाच लाख रुपये जमा होणार आहे तर दुसरीकडे राजनच्या अटकेची तयारी सुरू असल्याचे हवालदार ढवळे त्याला सांगणार आहे. त्यामुळे सावध होऊन राजन संजनाला धमकवणार आहे. हे सगळे पाहून संजनाकडे काम करणारी करीना घाबरणार आहे. ढवळे राजनला बातम्या पोहोचवतो हे करीना थेट रेवतीला फोन करून सांगणार आहे. त्यामुळे आता राजन शहरातील सगळ्यात प्रसिद्ध वकिलाची त्याच्यासाठी नेमणूक करणार आहे. हा वकील दुसरा कोणी नसून विश्वजीत आहे. विश्वजीतची भूमिका मालिकेत संजय जाधव साकारणार आहेत.
आपल्या समाजात अनेक लोक राहातात. पण त्यातही समाजातील प्रतिष्ठीत लोकांना एक वेगळेच वलय असते. ते काय करतात, कुठे जातात या प्रत्येक हालचालीकडे लोकांचे लक्ष असते. अशीच एक सुप्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्ती आत्महत्या करते. पण तपासाअंती पोलिसांच्या लक्षात येते की ही आत्महत्या नसून एक हत्या आहे. या मृत्युमागे काय गूढ आहे हे उलगडण्याचा प्रयत्न काय घडलं त्या रात्री मालिकेत केले जात आहे.